नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

जिव्हाळा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद 

डॉ.अभिजित मिसाळ :स्वकुळसाळी समाज बांधवाना दिनदर्शिकेचे मोफत वाटप 

वेब टीम  नगर : स्वकुळसाळी समाजाचे जिव्हाळा प्रतिष्ठानतर्फे समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातात.जिव्हाळा प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी वधुवर मेळावे घेतले जातात व विवाह नोंदणी केली जाते.हा उपक्रम समाजासाठी महत्वाचा आहे.जिव्हाळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी राज्यभर समाजातील वधूवरांची सूची तयार करून वधुवर मेळावे घेतात.तसेच यावर्षी सुंदर अशी दिनदर्शिका तयार करून कोणतीही जाहिरात न घेता स्वकुळसाळी समाज बांधवाना विनामूल्य दिनदर्शिका उपलब्ध करून दिल्या आहेत.जिव्हाळा प्रतिष्ठान नेहमीच सातत्याने समाजाभिमुख कार्य करीत असून ते कौतुकास्पद असे आहे असे प्रतिपादन अहमदनगर येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ् डॉ.अभिजित मिसाळ यांनी केले. 

 सुनील पावले म्हणाले कि,या दिनदर्शिकेचे वाटप अहमदनगर शहर,उपनगर,सावेडी,बुऱ्हानगर,केडगाव,भिंगार नागपूर,एम आय डी सी,कल्याणरोड येथे होणार आहे.जिव्हाळा प्रतिष्ठान समाजासाठी नेहमीच उपक्रमशील आहे.                                                                 

 बालिकाश्रमरोड येथील प्रणव संकुल येथे स्वकुळसाळी समाजाच्या जिव्हाळा प्रतिष्ठानतर्फे दिनदर्शिकेचा शुभारंभ मुंबई येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ् डॉ.अभिजित मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी जिव्हाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पावले,खजिनदार विठ्ठलराव पाठक,सचिव मीनाताई साळी,संचालक सुरेश इंगळे,चंद्रशेखर पिंपरकर,अभिजित अष्टेकर, उमा पाटेकर,शशिकला उगले,संजय ओहळ,संजय क्षीरसागर,सुभाष पाठक,सुधाकर साळी,राजेंद्र भंडारे आदी उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहर काँग्रेस क्रीडा विभागाची मैदाने, क्रीडा हॉल खुले करा 

जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले निवेदन 

वेब टीम नगर :  कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मुळे सर्वच गोष्टी शासनाने बंद केल्या होत्या. मात्र शासनाच्या नवीन अनलॉक धोरणाप्रमाणे अनेक गोष्टी आता खुल्या करण्यात आल्या आहेत. इनडोअर तसेच आऊटडोअर खेळांची शहर आणि जिल्ह्यातील विविध मैदाने आणि क्रीडा हॉल क्रीडापटूंना सरावासाठी तात्काळ खुली करण्यात यावीत, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी केली आहे. 

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस, एन. एस. यु. आयचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे निवेदन गीते पाटील यांच्यासह काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना दिले आहे. 

यावेळी युवक काँग्रेसचे विशाल भाऊ कळमकर, युवा पुरस्कार विजेते भैय्या बॉक्सर, प्रशिक्षक नारायण कराळे, मच्छिद्र साळुखे, प्रमोद अबुज, अमित भांड, राष्ट्रीय खेळाडु प्रियांका शिरसाठ, युक्ता मिस्तरी, वर्षा अहिररावमनोज उंदरे, आदित्य यादव, यश पगारे, तेजस रासकर , अनिल तोडकर आदींसह क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांच्याशी चर्चा करताना प्रवीण गीते पाटील म्हणाले की, कोरोना काळात अनेक महिने मैदाने बंद राहिल्यामुळे खेळाडूंचा सराव पूर्णतः बंद पडलेला आहे. त्याच बरोबर अनेक नियोजित स्पर्धा या कालावधीमध्ये होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे खेळाडूंचे नुकसान झालेले आहे. तसेच छोट्या क्रीडा अकादमी चालवणाऱ्या प्रशिक्षकांचे क्रीडा प्रशिक्षण वर्ग बंद पडल्यामुळे त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शासनाने अनलॉक धोरण जाहीर केल्यापासून अनेक बाबींना मुभा दिलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन करून अनलॉक सध्या पाळला जात आहे. यामध्ये मैदाने तसेच क्रीडा हॉल हे खुले करताना त्या नियमांचे पालन करत खेळाडूंना सरावासाठी मैदाने आणि हॉल तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या प्रशिक्षक, खेळाडूंच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे केली आहे. या मागणीची प्रत जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.

  ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पर्यावरण व आरोग्यासाठी स्वच्छतेची नितांत गरज

 प्राचार्य. डॉ आर.जे.बार्नबस : "स्वच्छता पंधरवड्या " निमित्त अहमदनगर महाविद्यालयात एनसीसी विभागाची स्वच्छता मोहिम

  वेब  टीम  नगर : एनसीसी महानिदेशक नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार व  १७  महाराष्ट्र बटालियन अहमदनगरच्या स्वच्छता पंधरवाडा नियोजित कार्यक्रमानुसार अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर एनसीसी विभागाने  स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. संपूर्ण देशभरात १ ते १५ डिसेंबर या कालावधी स्वच्छता पंधरवाडा म्हणून साजरा होत आहे. प्राचार्य डॉ.आर.जे बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. एम.एस.जाधव यांनी स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले.

     यावेळी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले, अशा उक्रमाची पर्यावरण व आरोग्यासाठी नितांत गरज आहे. या उपक्रमातून एनसीसी छात्रांमध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजेल आणि त्याचा दीर्घकालीन फायदा कुटुंब,समाज आणि देशाला होईल.

     कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून १७ महारष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट पी. व्यंकटेशन उपस्थित होते. पी. व्यंकटेशन व डॉ.एम.एस. जाधव यांनी छात्रांना मार्गदर्शन केले.

     लेफ्टनंट एम.एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील, १७ महाराष्ट्र बटालियन  प्रवेशद्वार, एनसीसी परेड मैदान, बाटलीन व बँक परिसर  इ. ठिकाणी स्वच्छता केली. एनसीसीच्या ८६ छात्रांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी मोलाचे  योगदान दिले. या उपक्रमाचे  १७ महाराष्ट्र बटालियनचे सीईओ कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली यांनी एनसीसी छात्रांचे कौतुक केले.

     या मोहिमेसाठी  बाटलीनमधील पी.आय. स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन आभार डॉ.एम एस जाधव यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नागवडे, डॉ.गायकर, डॉ.रझाक व रजिस्टर बळीद यांचे सहकार्य लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"सिटी टाइम्स" दिवाळी अंकाचे प्रकाशन

   वेब टीम   नगर : अहमदनगर सिटी टाइम्सच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. लेख, कविता या साहित्याची मेजवानी असलेला साप्ताहिक अहमदनगर सिटी टाइम्सचा दिवाळी अंक यंदा पृष्टसंख्येने कमी आहे, पण या अंकात पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वास्तूंची महती दर्शविणारे लेख वाचनीय  , संग्रही असावे, असे आहेत.

     इसवीसनापूर्वीपासून भिंगाराचं अस्तित्व असून, या मागचा आजपर्यंतचा इतिहास नमूद करणारा सुधीर कुलट यांचा लेख तर बाराव्या शतकात नगर जिल्ह्यात चक्रधर स्वामींचा आणि त्यांचा महानुभाव पंथाची महती मोडीलिपी वाचक आणि लेखक नारायण आव्हाड यांचा लेख आणि ‘वास्तू संवर्धन : काळाची गरज’ हा सदानंद भणगे यांचा लेख यात आहे. ‘मुलांचा बुद्धी विकास व त्यासाठी विविध उपक्रम हा प्रा.वसंत जोशी यांनी लेखातून सांगितला आहे. ‘लाल’चं महत्व असा वेगळा विषयाचा लेख बाळकृष्ण कुलकर्णी यांचा आहे. आध्यात्मिक आणि वार्षिक राशी भविष्य चिंतामणी देशपांडे तर पुंडलिक गवंडी, बिभिषण यादव आणि सुरेखा घोलप-भुकन यांच्या कविता यात आहेत. ‘गोष्ट छोटी सूख मोठे’ हा चिंतनाचा विषय संपादकीय लेखात मांडला आहे. कु.प्रतिभा सांगळे यांच्या सुरेख छायाचित्राने मुखपृष्ठ सजले आहे. या अंकाचं संपादन संपादक राजेश सटाणकर यांनी  तर सुस्मिता अय्यंगार यांनी संपादन सहाय्य केले आहे तर जयंत देशपांडे व रुपेश हिवाळे यांनी उत्कृष्ट मांडणी केली आहे. सुजय भंडारे आणि टीमने छपाई, बांधणी करुन अंक सजवला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘सिटी टाइम्स’ने स्वतंत्र  ठसा उमवत ३४ व्या वर्षात पदार्पण करत अंक तिसर्‍या तपाकडे वाटचाल करीत आहे.  पृष्टसंख्या २०असून किंमत - १५ रुपये आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत

रविवारी चर्मकार परिषदेचे आयोजन

   वेब टीम  नगर : महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरुद्ध चर्मकार समाजाने एकत्रित येऊन ठोस भुमिका घेण्यासाठी रविवार दि. १३ डिसेंबर२०२० रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत ओम गार्डन, सक्कर चौक,  येथे चर्मकार परिषदेचे आयोजन करण्यात आहे.

     गेल्या २-३ वर्षामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. ही फार गंभीर बाब आहे. यावर केवळ सामाजिक मोर्चे निघून विविध समाजामध्ये वितुष्ट निर्माण होऊन दुशित वातावरण निर्माण होत आहे. यावर उपाय योजना म्हणून काय करता येईल, यासाठी महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नेते, संस्थांचे पदाधिकार्‍यांना निमंत्रित केले आहे.

     तरी या विषयावर आपले मत मांडण्यासाठी आपण प्रत्येक समाज बांधव व भगिनींनी सदरील परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य निमंत्रक मीराताई शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.९८२३२८९९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मिरजगांव शाखेस ‘फर्स्ट रँक’ सन्मान

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने सत्कार

    वेब टीम  नगर : मिरजागांव येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेस क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने ‘फर्स्ट रँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल मिरजगांव शाखेचे व्यवस्थापक गणेश विधाते यांचा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने  कर्जत तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगीी माजी सरपंच दादासाहेब बुद्धीवंत, सोमनाथ बनकर, नवनाथ तुपे, दिलीप कोल्हे, अमित बनकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी राजेंद्र गोरे म्हणाले, बँक ऑफ महाराष्ट्राच्यावतीने पंचक्रोशितील लोकांना चांगली सेवा देण्यात येत आहे. विशेषत: कोरोना काळातही बँकेने कर्तव्यपलिकडे जाऊन काम करुन लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.   बँकेचे व्यवस्थापक गणेश विधाते यांनी बँकेच्या विविध योजन समजून सांगून त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. पिक कर्ज, व्यवसायिक कर्ज, इमर्जन्सी लाईन आदिंच्या माध्यमातून लोकांच्या कायम संपर्कात राहिले. बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करुन आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे त्यांचा हा गौरव झाला आहे. याचा पंचक्रोशितील नागरिकांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी दादासाहेब बुद्धीवंत यांनीही बँकेच्या चांगल्या कामाचे कौतुक करुन मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन केले. शेवटी सोमनाथ बनकर यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्नेहालयने दिली सेवा कार्याला नवी दिशा : एस.गणेशन

वेब टीम नगर : सर्वसामान्याना त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव करून देत आणि त्यांना कार्यप्रेरीत करून  वंचितांची सेवा करण्याचा अनोखा  आदर्श स्नेहालय परिवाराने निर्माण केला आहे.या कार्याचा सहयोगी  होण्यात एसबीआय म्युच्युअल फंड संस्थेला धन्यता वाटते, असे प्रतिपादन या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गणेसन. यांनी आज केले.

स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात आज एसबीआय म्युच्युअल फंड , यांच्या सहयोगाने उभारण्यात आलेल्या तीस किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आणि मोबाईल मेडिकल वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री एस. गणेशन  उपस्थित होते. स्नेहालयच्या वंचित स्त्रिया , मुले, झोपडपट्टी, शाळा, रोजगार कौशल्य, रुग्णालय , बालमाता पुनर्वसन आणि दत्तक विधान प्रकल्प,अत्याचारित महिलांसाठीचे स्नेहाधार आणि सखी केंद्र, समुदाय रेडिओ केंद्र रेडीओ नगर ९०. ४ एफएम ,आदी  उपक्रमाना   गणेशन  यांनी भेटी दिल्या. मोबाईल मेडिकल व्हॅन मध्ये रुग्णाची तपासणी, रक्त लघवी इत्यादी प्राथमिक तपासण्या, एक्सरे बघण्याची सुविधा, औषधे देण्यासाठी फार्मसी, सर्व प्रकारची वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यासाठी सुविधा आहेत.त्यामुळे  झोपडपट्ट्या खेडेगाव, वाड्या -वस्त्या, औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योग तसेच नगर ,राहुरी, आणि पारनेर  तालुक्यातील भटके-विमुक्त दलित वस्त्या, येथे वैद्यकीय शिबिरे, कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी सुविधा देणे शक्य होणार आहे. यावेळी संजय गुगळे, हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिष्टी जयकुमार मुनोत, डॉ. आतिश केदारी ,डॉ. पंकज गडाख, डॉ. मारसिया वॉरन,  डॉ. स्वाती आणि  सुहास घुले,विष्णू कांबळे, डॉ. सोनल रणसिंग, डॉ. सायली नाश्ते, डॉ. पूजा वाघ, डॉ. पर्वणी लाड, डॉ. अभिजित वांढेकर, अनिल गावडे , भारत सेवक निक कॉक्स, जोयस कोनोलीे, आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेचे 

माजी  आ. शिवाजी कर्डिले : फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने देवदान कळकुंबे, हरजितसिंह वधवा,  नितेश बनसोडे , स्वप्निल कुर्‍हे सन्मानि

वेब टीम नगर :  समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे. फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार बनली आहेत. महात्मा फुलेंच्या नावाने दिला जाणार्‍या पुरस्कारासाठी देखील निस्वार्थ भावनेने कार्य केलेल्या योग्य व्यक्तींची निवड झाल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.  

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेले बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, सावली संस्थेचे नितेश बनसोडे व अमरधाम येथील सेवक स्वप्निल कुर्‍हे यांना महात्मा फुले स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अय्युब पठाण, मयुर पाखरे, गौरव बोरुडे, अमोल धाडगे, राजू ताजणे, मयुर पाखरे, सौरभ बोरुडे, सुरेश नन्नवरे आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशन सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरला असून, टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने विविध शिबीरे घेण्यात आली. मागील पाच महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल४ हजार ३७० गरजूंनी लाभ घेतला. तर ९४८ ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे इतर आजाराच्या गरजू रुग्णांची परवड होऊ नये यासाठी फिनिक्सने कार्य केल्याचे विशद केले. तसेच चारही पुरस्कार्थींनी कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या सेवेचा आढावा घेतला.  

गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात ३७८ ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील ६७ लाभार्थींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच यावेळी ४३ गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेवगावच्या प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकावर कारवाई होण्यासाठी उपोषण

 तोतयागिरी प्रकरणी गुन्हा दाखल असताना दिले बोगस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

वेब टीम नगर : येथील शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी बोगस चारित्र्य पडताळणीचे कागदपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप करुन तातडीने त्यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात तक्रारदार संकेत कळकुंबे व मिनाक्षी कळकुंबे यांनी उपोषण केले. या उपोषणाला जय भगवान महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या (गवई गट) वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, संतोष पाडळे, पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीन खंडागळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोनूभाऊ शिंदे, हरीभाऊ डोळसे, कैलास गर्जे, मदन पालवे, प्रविण नाईक, अल्ताफ शेख, पवन भिंगारदिवे आदि सहभागी झाले होते.  

शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी शासनापासून खरी माहिती लपवून स्वतःची बोगस चारित्र्य पडताळणी करून घेतलेली आहे. पुरवठा निरीक्षक पदावर रुजू होण्यापूर्वी बिघोत यांच्यावर 17 सप्टेंबर 2016 रोजी पोलीस तोतयागिरी प्रकरणी सिडको (जि. औरंगाबाद) गुन्हा दाखल झालेला आहे. वेळोवेळी सदर व्यक्तीस सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याकरिता तहसीलदार शेवगाव ते मुख्यमंत्री मंत्रालय स्तरावर गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करण्यात आलेला आहे. बिघोत यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाईचा आदेश विभागीय आयुक्त साहेब यांनी देऊन सुद्धा सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सदर व्यक्ती कारवाईपासून वाचण्यासाठी पैशाचे आमिष व मारहाण करण्याचे धमक्या इतर व्यक्तीमार्फत देत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, बिघोत यांनी शासनाची फसवणुक केलेली आहे. शेवगाव येथील शासकीय कर्मचारी त्यांना या प्रकरणातून वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सदर प्रकरणी बिघोत यांना सरकारी सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्तांनी बिघोत यांना बडतर्फ करण्याचा आदेश दिलेला असताना त्याची अंमलबजावणी व्हावी व बोगस चारित्र्य पडताळणीद्वारे सरकारी सेवेत दाखल झालेले शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

छगन भुजबळांची भेट घेणार 

 शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी केलेला प्रकार हा गंभीर आहे. फसवेगिरी करणार्‍यांवर उचित कारवाई करण्याची गरज असून, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करावी. अन्यथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुकुंदनगरच्या वीज मीटर 

 डिपीच्या प्रश्‍नासंदर्भात विद्युत महावितरण कार्यालयास निवेदन

वेब टीम नगर :  शहरातील मुकुंदनगर भागातील रहिवाशांच्या वीज मीटर व डीपीच्या प्रश्‍नासंदर्भात जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, फारुक शेख, शहाबाज शेख, शहानवाज शेख, शब्बीर सय्यद, मीजान कुरेशी, मुर्शिद शेख, रिजवान सय्यद, नसीर सय्यद, अजय सोळंकी, मच्छिंद्र गांगर्डे, वसीम शेख आदिंसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.      

मुकुंदनगर येथील नागरिकांच्या घराचे मीटर एकत्रित रित्या त्यांच्या घरासमोरील विद्युत खांबावर बसवण्यात आले आहे. सदर काम ठेकेदाराने नियमाप्रमाणे केले नसून, अनेक ठिकाणी या बॉक्सची उंची ही जमिनीपासून कमी अधिक प्रमाणात ठेवलेली आहे. काही ठिकाणी तर जमिनीपासून अवघ्या चार फूट उंचीवर हे बॉक्स बसविण्यात आले आहे. सदरचे ठिकाण हे अत्यंत गजबजलेल्या रहिवशी ठिकाणी आहे. या भागातील लहान मुले सदर परिसरात खेळत असतात. मीटर बॉक्सच्या केबलला किंवा केबल कट झाल्यामुळे विद्युत खांबावर करंट उतरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या भागात अनेक वर्षापासून बसवलेली डीपी त्याच रहदारीच्या ठिकाणी अगदी रोडलगत बसवण्यात आलेली आहे. या डीपीच्या केबल व मीटर बॉक्स पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहेत. त्या डीपीच्या बाजूस संरक्षण भिंत किंवा तार कंम्पाऊंड करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. विद्युत खांबावर कमी उंचीवर बसविण्यात आलेले मीटरला योग्य ठिकाणी नियमाप्रमाणे लावावे व डिपीला संरक्षक कंम्पाऊंड टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याला विद्युत महावितरण कार्यालय जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करुन, सदर प्रश्‍न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments