गॅस सिलेंडरच्या स्फोटात १६ जखमी

गॅस सिलेंडरच्या स्फोटात १६ जखमी  

वेब टीम मुंबई : लालबागमधील साराभाई मेन्शमधील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. सकाळी सात वाजल्याच्या सुमारात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य आहे. साराभाई मेन्शमध्ये राहणाऱ्या राणे कुटुंबियांच्या घरात त्यांच्या मुलीचं लग्न असून आज हळदीचा कार्यक्रम होता.

मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई मेन्शमध्ये वास्तव्याला असणाऱ्या राणे कुटुंबियांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. राणे यांच्या मुलीच्या लग्न असून आज हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी घरात बरीच पाहुणे मंडळी उपस्थित होती. अशातच सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस गळती सुरु झाली आणि सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबप्रमुख मंगेश राणे गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळत आहे. यातील 12 जणांवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही वेळातच अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्फोट झालेल्या घराची पाहणी केली. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, '2013 साली एक ठराव मांडला होता की, केवळ सोसायट्यांनाच नव्हे तर सर्व इमारतींमध्ये गॅस पाईपलाईन दिली पाहिजे. त्यामुळे गॅस गळती किंवा स्फोटाची शक्यता कमी असते.' पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'या प्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

Post a Comment

0 Comments