नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

महिलांना काँग्रेस पक्षात काम करण्याची मोठी संधी - शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे


वेब टीम नगर : शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक महिला आहेत. त्या सतत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात काम करत असतात. जुन्या - नव्यांचा मेळ घालत अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठी संधी महिलांना काँग्रेस पक्षात असल्याचे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

नुकतीच शहरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या, सेवादलाच्या माजी शहर जिल्हाध्यक्ष नलिनीताई गायकवाड, महिला काँग्रेसच्या राज्य सचिव उषाकिरण चव्हाण, प्रदेश महिला कार्यकारणी सदस्य तथा माजी महिला शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई बागडे, माजी महिला शहर उपाध्यक्ष जहीदा झकारिया, ज्येष्ठ कार्यकर्त्या सिंधूताई कटके, निताताई चोरडिया आदी उपस्थित होत्या. 

यावेळी नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सुनीताताई बागडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तसेच नगरमध्ये देखील पक्षवाढीसाठी काम जोमाने सुरू आहे. पक्षामध्ये महिलांना मानाचे स्थान असून काँग्रेस पक्षामध्ये काम करताना महिलांना सुरक्षित वाटते अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. 

यावेळी काळे म्हणाले की, महिला काँग्रेसच्या माध्यमातून शहरामध्ये महिलांचे संघटन उभ करण्यासाठी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. महिला काँग्रेसने शहरातील महिलांचे विविध प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न धसास लावण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणे आक्रमक भूमिका घेईल. 

यावेळी युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, शहर काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण गीते पाटील, प्रमोद अबूज, अमित भांड, सौरभ रणदिवे, विशाल केकाण आदी उपस्थित होते.जिलेबी भरवून वर्षपूर्तीचा आनंद उत्सव साजरा. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्य लढ्यात लहुजी वस्ताद साळवे यांचे मोलाचे योगदान

आसाराम कसबे : निंबळकला लहुमुद्रा या सामाजिक प्रतिकाचे प्रकाशन

वेब टीम नगर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारक घडवून देश स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलीत केली. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यासाठी असलेले योगदान न विसरता येणारे असल्याची भावना प्रबोधनकार आसाराम कसबे यांनी व्यक्त केली.  

आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंबळक (ता. नगर) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समोर लहुजी वस्ताद यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेल्या लोकप्रबोधनी कला मंच समाजसेवी संस्था निर्मित लहुमुद्रा या सामाजिक प्रतिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा प्रबोधनकार कसबे बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्ता (राजू) रोकडे, सचिन साळवे, उद्योजक अविनाश आळंदीकर, हमीद पटेल, ज्ञानेश्‍वर रोकडे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, लखन नन्नवरे, अमोल पवार, सागर गायकवाड, राकेश जगधने, पवन वाघमारे, दीपक वैराळ आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तरुणांमध्ये सामाजिक जनजागृती होऊन लहुजी वस्ताद साळवे यांच्या देशभक्तीच्या विचारांची प्रेरणा देण्यासाठी लहुमुद्रा निर्माण करण्याचा उद्देश असल्याचेही कसबे यांनी सांगितले. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग नगर तालुका युवक अध्यक्षपदी समीर पटेल व सरचिटणीसपदी सिताराम सकट यांची नियुक्ती झाली असता उपस्थितांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. राजू रोकडे व सचिन साळवे यांनी संपुर्ण जिल्ह्यात लहुमुद्रा सामाजिक प्रतिकाचे प्रचार करण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस व्यक्त केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बालभवनसह शहरात लंगरचे वाटप

गुरुनानक देवजी जयंती निमित्तघर घर लंगर सेवेचा उपक्रम

वेब टीम नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी सुरु झाल्यापासून मागील साडे सात महिन्यांपासून शहरात गरजू व वंचित घटकांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या वतीने गुरुनानक देवजी यांच्या५५१ वी जयंती लंगर (प्रसाद) वाटून साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील उन्नती बालभवन मधील विद्यार्थ्यांना व गरजूंसाठी मिष्टान्न भोजन असलेले लंगरचे वाटप करण्यात आले.

पोलीस लॉन येथे लंगर तयार करुन बालभवन येथे प्रशांत मुनोत, राहुल बजाज, जस्मितसिंह वधवा, कैलाश नवलानी, संदेश रापरिया, पुरुषोत्तम बेट्टी, सुनिल थोरात, करण धुप्पड, कमलेश गांधी, बालभवनच्या शबाना शेख आदि सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये लंगरचे वाटप करण्यात आले. तसेच शहरात ठिकठिकाणी देखील गरजूंना लंगरचे वितरण झाले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अट रद्द करा 

बाबासाहेब महापुरे : विशेष सहाय योजनेच्या अडचणीचे आमदार लंके यांना निवेदन

हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करुन सदर प्रश्‍न सोडविण्याचे लंके यांचे आश्‍वासन

वेब टीम नगर: नगर-हयातीच्या दाखल्या बरोबर संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना पन्नास हजार उत्पन्नाचा दाखला व इंदिरागांधी वृध्दापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन या लाभार्थांना एकवीस हजाराचा  उत्पन्नाचा दाखला प्रती वर्षी सादर करणे बाबत शासन आदेश झाले आहेत. या जाचक अटीमुळे गोरगरीब, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या असून, ही जाचक अट रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने आमदार निलेश लंके यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे व बाहुबली वायकर उपस्थीत होते.

सदरील योजनेसाठी लागणार्‍या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अनेक तलाठी कमी उत्पन्न दाखला देण्यास टाळाटाळ करतात, ज्यांना कमी उत्पन्नाचा दाखला मिळतो तो सर्कल चौकशी मध्ये रद्द होतो. अशा अनेक अडचणी सध्या सुरू आहे. या नियमामुळे अनेक लाभार्थी यांना कमी उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने त्यांचे अनुदान बंद होणाच्या मार्गावर आहेत. या अनुदानावरच कित्येक लाभार्थी आपला उदरनिर्वाह करतात. हे अनुदानच त्याच्या जगण्याचे साधन बनले आहे. हे अनुदान बंद झाल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर होणार असून, यावर शासन स्तरावर पत्रव्यवहार करून उत्पन्न दाखल्याची जाचक अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार लंके यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न मांडून या प्रश्‍नाची सोडवणुक करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

दरवर्षी उत्पन्न दाखला देण्याची अट म्हणजे गोरगरीब, निराधार, दिव्यांग यांच्या अनुदानावर गदा आणण्याचा प्रकार शासन करित आहे. ही जाचट अट त्वरीत रद्द करावी, अन्यथा दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्यस्तरावर आंदोलन छेडले जाणार आहे. 

-बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष -सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था) 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सकल मराठा समाज ,मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 

महावितरण कार्यालया समोर ठिय्या

 मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलल्याचा निषेध

वेब टीम नगर : उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर पाटील, जिल्हा समन्वयक बाळासाहेब पवार, रामदास भोर, बाळासाहेब हराळ, राजेंद्र भागवत, विशाल कोकाटे, विशाल म्हस्के, सर्जेराव शिंदे, किरण तराळ, प्रवीण थोरात, अनिकेत आवारे, प्रशांत काळे, सचिन रेडे, राजेंद्र भोर, गणेश थोरात, सागर बडे, राहुल काळे, प्रशांत लवांडे, श्रीपाद दगडे, गोरख आढाव, चंदू नरवडे, राम झीने आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण विभागात उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्या अनुषंगाने एक व दोन डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयात होत आहे. परंतु या कागदपत्र पडताळणी मधून मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे. एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक व दोन तारखेला कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात यावी, मराठा समाजातील मुलांना भरतीप्रक्रियेत डावलून एक प्रकारे मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे. याविरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना आहे. राज्य सरकार व महावितरणाच्या उपरोक्त कृतीचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत असून उपरोक्त चूक तात्काळ सुधारण्यात यावी अन्यथा मराठा समाजातून या विरोधात तीव्र प्रक्रिया उमटल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दरवर्षी हयातीचा दाखला ,उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती शिथिल करा

दिव्यांगांच्या पेन्शन प्रश्‍नी जनाधार संघटनेच्या दिव्यांग सेलचे निवेदन                             

वेब टीम नगर : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने दरवर्षी हयातीच्या दाखल्या सोबत उत्पन्न दाखल्याची लावण्यात आलेली जाचक अट शिथील करण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटना प्रणित दिव्यांग सेलच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे गृहशाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी जन आधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पवार, दीपक गुगळे, अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, मधुकर भोसले, सचिन साबळे, गुलाब शेख, गणेश निमसे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने हयातीसह उत्पन्नाच्या दाखला दरवर्षी सादर करण्याची जाचक अट घातली आहे. या अटीमुळे दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कामासाठी त्यांना इतरांपुढे हात पसरवण्याची वेळ येत आहे. तर ही अट पुर्ण करण्यासाठी मोठ्या तणावाखाली वावरत आहे. दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवन जगत असताना हालचाल करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे दाखले काढण्यासाठी व पुन्हा ते दाखले तहसील कार्यालयात जमा करण्यास कुणाची मदत घ्यावी हा प्रश्‍न पडला आहे. हे दाखले सादर न केल्यास उदरनिर्वाहासाठी मिळणारी पेन्शन बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. मिळणारी पेन्शन ही लाखो असह्य दिव्यांग व निराधारांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनलेले आहे. तरी शासनाने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने दरवर्षी हयातीच्या दाखल्या सोबत उत्पन्न दाखल्याची लावण्यात आलेली जाचक अट शिथील करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 माजी सैनिकांना पोलीसाकडून अरेरावीची भाषा

त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने अपमानास्पद वागणुक देणार्‍या पोलीसाचे निलंबन करण्याची मागणी  

वेब टीम नगर : माजी सैनिकांना पोलीसाने अरेरावीची भाषा करुन अपमानास्पद वागणुक दिल्याचा त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधीत पोलीसाचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण व पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष विजय गवारे, उपाध्यक्ष शिवाजी पडोळे, ओआरटी प्रमुख अशोक गोरे, पद्माकर पाथरे, सचिव चंद्रकांत कवळे, अ‍ॅड. संजय शिरसाठ, भिराज पाटेकर, भानुदास केदार, संतोष शिदोरे, जालिंदर कराळे, वसंत घुंगरे आदी उपस्थित होते.    

कर्तव्यावर असलेल्या अक्षय गरजे (रा. अकोला) या सैनिकावर कौटुंबिक वादातून पाथर्डी पोलीस स्टेशन ला एनसी दाखल करण्यात आली. सदरील वाद आपसात मिटवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे माजी सैनिक पोलीस स्टेशनला आले होते. सदर प्रकरण मिटवण्यास गेले असता अकोला बीट हवालदार बांगर यांनी माजी सैनिकांना अरेरावीची भाषा केली.तर सहकार्याची भूमिका न घेता अपमानास्पद वागणुक दिल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. माजी सैनिकांना अपमानास्पद वागणुक देणार्‍या संबंधीत पोलीस कार्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आली आहे. अन्यथा पाथर्डी तहसील कार्यालया समोर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याच इशारा माजी सैनिकांनी दिला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देह व्यापारातील बळी महिलांना  विविध योजनांचा लाभ  देण्यास जिल्हारुग्णालय कटिबद्ध– डॉ.अरुण सोनवणे

वेब टीम नगर :  देह व्यापारातील बळी महिलांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ  देण्यास जिल्हा रुग्णालय कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाचे हिपँटायटीस बी तपासणी मोहिमेचे समन्वयक डॉ. अरुण सोनवणे यांनी केले.

जागतिक एच. आय. व्ही./एडस सप्ताहनिम्मित स्नेहालय, लायन्स क्लब अहमदनगर, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय आणि महालॅब अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देह व्यापारातील बळी महिलांसाठी 'वीर रणरागिणी' महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनवणे बोलत होते. ते म्हणाले की, देह व्यापारातील बळी महिलांना विविध आरोग्याच्या योजना मिळवून देण्यास जिल्हा रुग्णालय स्नेहालय सोबत काम करेल. यावेळी व्यासपीठावरप्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर) डॉ. अमित बडवे (अध्यक्ष, लायन्स क्लब) सुधीर लांडगे (सचिव, लायन्स क्लब, अहमदनगर), डॉ. विक्रम पानसंबळ (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए.आर.टी. विभाग, जिल्हा रुग्णालय, ), शिवाजी जाधव (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकु विभाग, जिल्हा रुग्णालय), राहुल कडूस (समुपदेशक, आय.सी.टी.सी. विभाग), डॉ. सोनाली बोरा (वैद्यकीय अधिकारी, स्नेह्ज्योत प्रकल्प) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय व्हायरल हिपँटायटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिपँटायटीस बी आणि हिपँटायटीस सी निशुल्क तपासणी/चाचणी शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी २५० पेक्षा अधिक महिलांनी हिपँटायटीस बी आणि हिपँटायटीस सी ची तपासणी करून घेतली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत मा. दिपक बुरम म्हणाले की, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत विविध आरोग्याच्या योजना, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र व ए.आर.टी.चे औषधे घरपोहोच मिळावे या हेतूने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय योजना, घरकुल योजना मिळविण्यासाठी देह व्यापारातील बळी महिला यांची संख्या, नाव,पत्ता आदी माहिती घेऊन प्रशासनामार्फात अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न स्नेहालय करणार आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. ती कागदपत्रे महिलांकडे नसल्यामुळे त्यांना शासकीय तसेच आरोग्य योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलाच्या मदतीचे निकष बदलले जावेत, असेत्यांनी नमूद केले.

 शिवाजी जाधव म्हणाले की, देह व्यापारातील महिलांनी आपल्या आयुष्याची झालेली ससेहोलपट विसरून नव्याने जीवन जगणे आवश्यक आहे. आज देशातील अनेक महिलांनी देह व्यापार सोडून नवीन कौश्यले अंगिकारली आहेत. उत्तम प्रकारचे रोजगार ते आज मिळवीत आहेत. आपण प्रत्येक वेळेस इतरांकडे बोट न दाखविता व्यसनाधीनते पासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्यत्न करणे गरजेचे आहे.

डॉ. अमित बडवे म्हणाले की, महिलांनी बचतीची सवय लावावी. बचतीची कास धरली तर आर्थिक विकासहोण्यास मदत होईल. मा. सुधीरजी लांडगे यांनी भविष्यात लायन्स क्लबच्या माध्यमातून रोजगाराच्या दृष्टीने नवीन प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश काळे, फिरोज पठाण, प्रवीण बुरम, संजय जिंदम, मझहर खान, मीना पाठक, सविता करंडे, आशा जाधव, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी माने  यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक चिंधे  यांनी मानले.



Post a Comment

0 Comments