नगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ठिय्या आंदोलन

 नगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ठिय्या आंदोलन

आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्‍वासन

 वेब टीम नगर - नगर-दौंड  विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएससीआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, दिपक दांगट, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश पवार, अनिकेत जाधव, शुभम साबळे, आकाश कोराळ, मोहन जाधव, राहुल कांबळे, भरत माळवदे, प्रकाश जाधव, आकाश कोलघळ आदि उपस्थित होते.

     यावेळी बोलतांना नितीन भुतारे म्हणाले, नगर-दौंड रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे, तरीही गेल्या अनेक दिवसांपासून व्हीआरडीई ते विद्यानगर भागातील रस्ता पूर्ण केलेला नाही, हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, तो दुरुस्त करावा, यासाठी निवेदने, खड्ड्यात वृक्षारोपण केले परंतु आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. तेव्हा आज हे आंदोलन करत असल्याचे सांगून या खराब रस्त्यामुळे आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासनास अजून जाग आलेली नाही. आतातरी तातडीने  हा रस्ता दुरुस्त करुन चारपदरी रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करावी. अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी नितीन भुतारे यांनी दिला.

     याप्रसंगी  सचिन डफळ म्हणाले, या भागातील बराचसा रस्ता चांगला झाला असून, फक्त हा विद्यानगर परिसरातील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाला असून, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. या खराब रस्त्यामुळे जाणे-येणे मुश्किल झाले असून, अपघात तर नित्याचेच झाले आहे, तसेच धूळीमुळे या परिसरातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी.

     यावेळी एमएससीआरडीसीच्या अधिकार्‍यांनी आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीबाबत सकारात्मकाता दाखवत येत्या आठ दिवसात या रस्त्याचे कामास सुरुवात केली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

Post a Comment

0 Comments