जीवनात कितीही मोठे ध्येय गाठले, तरी सामाजिक बांधिलकी जपावी
डॉ. भास्करराव शिरोळे : अळकुटीत गावात रक्तपेढी उभारण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प
वेब टीम नगर : श्री साईनाथ हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन २००५-०६ इयत्ता बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. जुने मित्र मैत्रिणींनी या स्नेह मेळाव्यात हजेरी लावून आपला शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. चौदा वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी बालपणीच्या जीवनात रममाण होवून धमाल केली. तर माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेऊन अळकुटी (ता. पारनेर) गावात रक्तपेढी उभारण्याचा संकल्प व्यक्त करुन त्या दिशेने कार्य सुरु केले आहे.
बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. तर अनेक वर्षांपासून आपल्या कौटुंबिक जीवनात रमलेले असताना थोडी उसंत काढत आपल्या मित्र-मैत्रिणींसह आनंद घेण्यासाठी या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जुने मित्र आपले सर्व काम बाजूला सारुन एकमेकांना भेटण्यासाठी या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भास्करराव शिरोळे उपस्थित होते. शिरोळे यांचा माजी विद्यार्थ्यांनी सन्मान केला.
प्रास्ताविकात रुपाली लाळगे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या मेळाव्याचा उद्दीष्ट स्पष्ट केला. डॉ. भास्करराव शिरोळे म्हणाले की, सन २००५-०६ बारावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. फक्त आनंद घेण्यासाठी एकत्र न येता सामाजिक जाणीव ठेऊन गावात रक्तपेढी उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. जीवनात कितीही मोठे ध्येय गाठले, तरी सामाजिक बांधिलकी जपण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया मावळे व प्रवीण साळवे यांनी केले. आभार हनुमंत भोर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी हनुमंत भोर, प्रवीण घोलप, समीर शेख, भरत लामखडे, सविता (राधा) चौधरी, सुप्रिया मावळे, मनोहर कनिंगध्वज, सुजाता डेरे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments