२६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, कामगारांचा मोर्चा

 २६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर 

 शेतकरी, कामगारांचा मोर्चा

देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीची पुढाकार


वेब टीम नगर - २६ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर हमाल पंचायत येथे बुधवारी (दि.१८ नोव्हेंबर) शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीची बैठक पार पडली. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित गुरुवार दि.२६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. यावेळी आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महापालिका कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे, शिक्षकेतर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, किसान सभेचे कॉ. बन्सी सातपुते, बापू राशीनकर, सतीश पवार, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे, विजया घोडके, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.

टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि शेतकरी विरोधी तीन कायदे, शिक्षक, पालक विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करणे, जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागू करणे आदी विविध मागण्यांकरित हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या बंद मध्ये प्रत्येक संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, हमाल-मापाडी संघटना सहभागी होणार आहेत.

 शहरात गुरुवार दि.२६ नोव्हेंबरला सर्व कामकाज बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे बैठकित ठरविण्यात आले. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्तरातून केंद्र सरकार विरोधात असंतोष असून, सर्वच संघटना उत्सफुर्तपणे या बंद मध्ये सहभागी होणार आहे. अनेक संघटनांनी शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे.


Post a Comment

0 Comments