सीना नदी सुशोभिकरणाची मोहीम पुन्हा सुरू व्हावी

 सीना नदी सुशोभिकरणाची  मोहीम पुन्हा सुरू व्हावी

दोन वर्षापूर्वी सीना नदी सुशोभिकरण करण्यासाठी नदीपात्रातील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम सुरू केली होती. त्यावेळी नदीपात्राची खोली व रुंदी वाढवण्याच्या कामालाही प्रारंभ केला होता. मे-जून २०१८ मध्ये बऱ्यापैकी हे काम सुरू होते.अतिक्रमण काढणे प्रशासनाला किती त्रासदायक असते हा अनुभव त्या वेळी आला,तर नंतर हे काम रेंगाळत गेले त्याच वेळेला पावसाळ्यात काम थांबवावे लागले ते पुढे सुरू झालेच नाही यंदा २०२० मध्ये या घटनेला २ वर्ष पूर्ण झाले पण अद्यापही हे काम स्थगितच आहे. 

नगरकर या कामाच्या प्रतिक्षेत आहेत.नगर शहर विकासाच्या दृष्टीने सीना नदी सुशोभीकरण आवश्यक आहे.शहराचे विद्यमान महापौर,आमदार या भागाचे खासदार,पालकमंत्री,महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्थगित केलेल्या सीना नदी सुशोभिकरण काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे अशी नगरकरांची इच्छा आहे. 

जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिकेत प्रभारी आयुक्त म्हणून सन २०१८ मध्ये राहुल द्विवेदी यांनी सीना नदी सुशोभीकरण करण्याची घोषणा करून नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम सुरू केली होती.या मोहिमेचे नगरकरांनी स्वागत करून जिल्हाधिकारी द्विवेदी यांना धन्यवाद ही दिले होते.


अशी धडक मोहीम राबवून विकास करण्याचा प्रयत्न करतातच असे नाही पण सरासरी राजकीय लोकप्रतिनिधी त्या वेळच्या प्रशासनाच्या सीना नदी सुशोभिकरणासाठी मोहीम राबवत असल्याने या मोहिमेकडे नगरकरांचे लक्ष वेधले गेले.त्यावेळी नदीपात्राची खोली व रुंदी वाढविण्याचा प्रयत्न केला होता, पण काही महिन्यातच हे काम थांबवावे लागले ते पुन्हा सुरू झालेच नाही. जर ही मोहीम यापुढे राबविण्यात येणार नसेल तर नदीपात्रात जैसे थे परिस्थिती निर्माण होण्यास विलंब लागणार नाही.नागपूर बोलेगाव ते बुरुडगाव असा १४ किमी नदीपात्रात गाळपेरासह अतिक्रमणे आहेत. त्यामुळे नदीपात्र मोठे व रुंद असूनही प्रत्यक्ष नदीपात्राची अवस्था गटारी-नाल्या सारखी लहान झालेली आहे.त्यात शहरातील ड्रेनेज वाटे वाहून जाणाऱ्या घाण आणि गटारीचे पाणी या नदीपात्रात सोडले जाते,त्यामुळे नदीपात्र दूषित झाले आहे.दूषित पाणी व घाणीची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याची गरज आहे.राज्यशासनाच्याही महापालिकेला तशा सूचना आहेत पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. 

सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून नदीपात्राची खोली व रुंदी वाढवणे,नदीपात्र निश्चित करून पात्राच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करणे,दोन्ही बाजूला घाट बांधणे व तेथे उद्यान विकसित करणे, त्याशेजारी जॉगिंग ट्रॅक सारखा पदपथ करणे,पथदिवे बसवणे आणि नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी अडवून नदीपात्र स्वच्छ करणे आदी कामे सीना नदी सुशोभिकरणाच्या कामात समाविष्ट होती. पण नदी मोहीम स्थगित झाल्याने नदी सुशोभिकरणाचा प्रश्न अनिर्णित राहिला म्हणून ही मोहीम पुन्हा सुरू करून सुशोभिकरण करणार याबाबत कुणीच बोलत नाही. 

२०१८ च्या मोहिमेचे नदीवरील अतिक्रमणे हटवून नदीपात्राचे खोलीकरण करण्यात आले आणि या पात्राच्या रुंदीकरणाचा ही प्रयत्न झाला होता. पण पात्रातील वीटभट्टी,गाळपेर,अतिक्रमणे पूर्णपणे हटवण्यात आणि नव्हती आणि नाही ही दुर्दैवी बाब आहे.या मोहिमेमुळे सीना नदी सुशोभिकरणाचे नगरकरांचे स्वप्न पूर्ण होण्याची अपेक्षा होती मात्र ते अपूर्णच राहणार का असा सवाल उपस्थित होत आहे.आपले शहर सीना नदीकाठी आहे नदीपात्राची अवस्था पाहता ही नदी आहे हे सांगूनही त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे नदी कशीबशी मार्गस्थ होताना दिसते.या नदीचा काठ प्रशस्त करण्याचे म्हणजे रुंदीकरण करण्याची गरज आहे त्यानंतरच सीना नदी सुशोभिकरणाचा विषय ऐरणीवर येईल.ओढे-नाले यातील वाहून जाणारे पाणी अर्थात पावसाचे पाणी नदीपात्रात जमा होते व ते पुढे वाहून जाईल.आता शहराच्या वाढत्या लोकवस्ती मुळे असे ओढे-नाले ताली बुजवून त्यावर घरे बांधली जातात त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही परिणामी हे पाणी शहरातून जागोजागी साचते शहरातील काँक्रिटीकरण डांबरीकरणामुळे रस्त्यातही पाण्याचा निचरा होत नाही.  जमिनीत पाणी झिरपत नाही शहरातील रस्त्याच्या कडेला पूर्वीसारख्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटारी आता राहिल्या नाहीत अशा गटारी मधून तरी हे पाणी वाहून नदीपात्रात मिळाले असते आपल्याकडे पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा प्रश्न फारसा निर्माण होत नाही.नदीपात्रातून पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी बंद केलेले नाले-ओढे त्यावरील अतिक्रमणे काढून त्यांची खोली व रुंदी वाढवावी या ओढ्या नाल्यांच्या बाजूने सुषोभिकरण करावे सुंदर शहर हरित नगर ही घोषणा अशीच प्रत्यक्षात अमलात आणावी लागेल. 

जलसंधारणाच्या निमित्ताने पर्जन्यमान वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची आणि जलयुक्त शिवार अर्थात नदी-नाले-ओढे ताली पाझर  तलाव यांच्यातील गाळ उपसा करून त्याची पाणी क्षमता वाढवणे भाजप-सेना राज्य सरकारचा हा प्रयत्न होता. मात्र तो यशस्वी झाला नाही पण अजूनही वेळ गेलेली नाही. 

नगर शहर स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत त्यात सीना नदी सुशोभिकरणाची मोहीम राबवणे आवश्यक आहे.  अतिक्रमणांमुळे गाव शहराचे सौंदर्य नष्ट होते तसे नदी-नाल्यांचेही होते. तसे अतिक्रमण सर्वत्र आहे आहे मात्र येथे नदी-नाल्यांना पूर असा हा विषय आहे गतवर्षी कोल्हापूर शहरात नदीला पूर आल्याने पुराचे पाणी शहरात साचले होते. यामागे नदीपात्र अरुंद व खोली बुजविल्याने ही अवस्था झाली होती. त्यात ओढे-नाले आदी बुजविल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही.त्यामुळे पुराचे पाणी शहरात घुसले होते.  तशीच परिस्थिती आपल्याकडे आहे.  पावसाचे प्रमाण कमी असल्याने व नदीला पूर फारसा येत नसल्याने नगर शहरावर तशी वेळ आली नाही मध्यंतरी पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सीना नदीच्या पुराचे पाणी बागरोजा हडको तील घराघरात साचले होते असे काही अनुभव आहेत. प्रश्न किचकट आहे मात्र असे प्रश्न सोडविल्यानेच इतिहास घडणार आहे.नवनीतभाई बार्शीकर यांच्या विकास कामांची चर्चा आजही होते कारण ती त्या काळाची गरज होती. तसे प्रयत्न या नंतर फारसे झाले नाहीत विकासाच्या दृष्टीने असे अनेक प्रश्न आहेत. नगर हे ऐतिहासिक शहर आहे पर्यटन हा विषय स्वतंत्र आहे पण विकासाच्या दृष्टीने पर्यटन हा विषय ही पुढे यावा अशी अपेक्षा आहे. अर्थात विकासाच्या दृष्टीने खरंतर चर्चा होत नाही तशी नगरसेवकांसह कोणालाही  गरज वाटत नाही.  गट-तट,राजकारण याकडे त्यांचे लक्ष असल्याने वर्षानुवर्ष विकासाचे प्रश्‍न उपस्थित होत नाहीत हे नगरकरांचे दुर्दैव आहे. 


- राजेश सटाणकर


Post a Comment

0 Comments