दिवाळी विशेष : द ट्रूथ

दिवाळी विशेष : द ट्रूथ

    द ट्रुथ 


सकाळी सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. आणि काही मिनिटातच पाण्याच्या आवरणाखाली सारं शहर झाकलं गेलं. पाऊस एवढा जोरदार होता ही क्षणात सगळीकडे तळी साचली. त्यामुळे शहरातील रस्ते ठप्प झाले. थंडगार वारे वाहू लागले. वातावरणात कमालीचा गारठा आला रस्त्यावर थोडीफार वर्दळ होती, पण अचानक सुरू झालेल्या पावसाने सगळीकडे गडबड उडाली. जो तो आपल्या घराच्या उबेत परतण्यासाठी पळत सुटला.

       पण रस्त्यावरून मान खाली घालून चाललेल्या त्या उंच, किडकिडीत माणसाला आजूबाजूच्या वातावरणाची काहीच फिकीर नव्हती. साचलेल्या पाण्यातून चबक चबक आवाज करत तो आपल्याच नादात झपझप चालत होता .पळता पळता लोक त्याच्यावर आदळत होते. पण त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं तो एका अनामिक आनंदात चालला होता. आपल्याला झालेला आनंद घरी जाऊन बायकोला कधी एकदा सांगतो असं त्याला झालं होतं. त्याचा भूतकाळ आता पुसला जाणार होता आणि सोनेरी भविष्याची स्वप्न तो रोझी बरोबर बघू शकणार होता. रोझी आनंदाने किती वेडी होईल, स्वतःभोवती एक गिरकी मारून आपल्याला मिठीत घेईल.अस स्वप्न तो बघत होता. तिची इच्छा अखेर पूर्ण होणार होती .अशा नादातच तो चालला होता. पुढे सिग्नल लाल झाला म्हणून क्षणभर तो थांबला . उजवीकडे वळल्यावर त्याच्या घराची वाट होती. आता हा रस्ता कायमचा मागे पडणार होता.


     
       शकील हे नाव गुन्हेगारी जगात तसे पर्यायांपैकी गाजलेलं होतं चोऱ्या ,मारामाऱ्या यात त्याचा हात धरणारं कोणी नव्हतं.  गरिबीत आणि झोपडपट्टीत वाढलेला शकील तिथल्या अनेक मुलांप्रमाणेच आपसूकच गुन्हेगारी जगाकडे ओढला गेला आधी छोट्या मोठ्या चोर्या, झोपडीतल्या मुलांबरोबर मारामाऱ्या करता करता तो झोपडपट्टीचा दादा बनला.तिथे चालणार्या  अनेक अवैध धंद्यात त्याने आपला जम बसवला. घरी अठराविश्व दारिद्र्य ,बाप दारुडा, आई मोलमजुरी करून ,वेळ पडली तर भीक मागून सगळ्यांची पोट भरत असे .बापाच्या दारुमुळे त्याची लहानपणापासूनच दारूशी ओळख झाली. बापाला दारू आणून देता देता तो कधी इतर ठिकाणी दारू पोचवायला लागला हे त्यालाच कळलं नाही. या धंद्यात हातात पैसा येतो आणि त्या पैशाने घरात सुखसोयी घेता येतात हे त्याच्या फार लवकर लक्षात आले. त्यामुळे त्याने त्या धंद्यात चांगलाच जम बसवला आणि हळूहळू इतरही गोष्टी करत तो झोपडपट्टीचा दादा बनला. त्याच्या लक्षात आलं होतं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत नाही तर पैसा लागतो. आणि तो कसाही कमवला तरी पैसा हा पैसा असतो. त्याच्या या समजुतीमुळे गुन्ह्याच्या रस्त्यावर हळूहळू पडणारी त्याची पावलं भराभर चालू लागली.




       अनेक गुन्हे, हाफ मर्डर चोऱ्या, मारामाऱ्या त्याच्या नावावर जमा होते .अनेक टोळ्यांशी  त्याचे घनिष्ठ संबंध होते. कित्येक वेळा त्यांच्यामध्ये टोळीयुद्ध ही चालत असतं. आपल्या वर्चस्वासाठी ते आवश्यकच होते. रोज रात्री तो झोपडीतल्या एका बार मध्ये दारू प्यायला जात असे .त्याच बारमध्ये बार टेंडर म्हणून काम करणारी रोझी त्याच्या नजरेला पडली. पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. हळूहळू त्याने तिच्याशी ओळख वाढवली. रोझी अस्सल कॅथलिक होती. देवधर्म पाळणारी येशूच्या शिकवणीवर विश्वास ठेवणारी होती. नाईलाज म्हणून बार टेंडरची नोकरी करत होती. तिला शकीलची ख्याती माहीत होती. म्हणून ती त्याच्या पासून जपूनच राहत होती. तो झोपडपट्टीचा दादा आहे एवढंच तिच्या लेखी त्याचं महत्त्व .घर चालवण्यासाठी पैसा हवा होता आणि या नोकरीत तो तिला मिळत होता. ती दुसऱ्या नोकरीच्या शोधात होतीच पण त्यासाठी तिला ही नोकरी करणं भाग होतं पण शकीलच्या ते गावीही नव्हतं. तो पूर्णपणे तिच्या प्रेमात वेडा झाला होता आणि ही गोष्ट तिला कशी सांगायची या विवंचनेत होता .त्याला रोझीची मतं माहीत होती. ती आंतरधर्मीय विवाहाला कधीचा तयार होणार नाही म्हणून तो घाबरत होता. पण रोझी साठी काहीही करायची त्यांची तयारी होती शेवटी धीर करून एक दिवस त्याने आपल्या मनातली गोष्ट तीला सांगितली ती पहिल्यांदा घाबरून गेली दादा म्हणून त्याचा दरारा  तिला माहीत होता म्हणून तिने, त्याच्या भावनांचा आपण योग्य तो आदर करतो पण तरीही त्याचं प्रेम आपल्याला स्वीकारता येणार नाही हे ठामपणे त्याला सांगितले शकील वेडापिसा झाला तिला हरप्रकारे मनवायचा प्रयत्न केला. पण ती ठाम होती. त्याने तिला वचन दिले कि आपण हे गुन्हेगारी जग सोडून चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करू पण तिला हे पटत नव्हतं, तिचं म्हणणं होतं की गुन्हेगारी व्यक्तिश  लग्न केले तर घरचे लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत आणि गुन्हेगारांनी जरी गुन्हे करणार थांबवलं तरी ते जग त्यांची पाठ सोडत नाही, त्याला विसरत नाही. कधी ना कधी त्याची छाया आपल्या संसारावर पडेल. आणि हे तिला मान्य नव्हतं. परंतु शकील ने रोझीला वचन दिल्या प्रमाणे चांगल्या माणूस बनण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालू केले. त्याने हायवेला एक जागा घेऊन तिथे गॅरेज टाकले हळूहळू त्याचे गुन्हे कमी होत गेले. रोझी साठी काहीही करायची त्याची तयारी होती त्याचे हे प्रयत्न बघून रोझीलाही विश्वास वाटला आणि त्याला साथ देण्याच्या इराद्याने तिने त्याच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला सहा महिने झाले होते शकील खूपच खुशीत होता रोझी म्हणजे त्याचं जग होतं. पहिल्यांदा त्याच्या गॅरेजमध्ये यायला लोक घाबरत असत ,पण रोझीने आणि त्याने लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला त्यातूनच त्याचा हळूहळू जम बसत चालला. रोझीनेही आता बार टेंडर ची नोकरी सोडून त्याच्याबरोबर गॅरेजमध्ये मदत करू लागली. ती ग्राहकांना विश्वास देत होती की शकील आता सुधारला आहे . तिच्या प्रयत्नांना यश येत होतं. गॅरेज हळूहळू चांगलं चालू लागलं आता त्याने गॅरेज जवळच भाड्याने जागा घेऊन त्या घरात राहायला गेले .त्याचे दिवस छान चालले होते. पण त्याच्यावर छोट्या-मोठ्या चोरीच्या केसेस होत्या त्यात त्याने सरेंडर केल्याने त्याला नुसत्या दंडा वरच सोडून देण्यात आलं होतं .तरीही एका हाफ मर्डर च्या केस मध्ये त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली. तो तुरुंगात गेला पण ही शिक्षा भोगून आल्यावर आपण पूर्णपणे चांगला माणूस होऊ अशी त्याने रोझीला  खात्री दिली कारण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणं भाग होतं. रोझीनेही समजूतदारपणा दाखवत त्याची साथ दिली तो गेल्यावर ती त्याचं गॅरेज व्यवस्थित चालवत होती. तुरुंगात भेटायला जाऊन त्याला धीर देत होती. तो खरच सुधारला यावर तिचा विश्वास होता तुरुंग अधिकार्यांनीही त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी केला होता. आणि आज अचानक त्याची दोन वर्षातच सुटका झाली होती. त्याच्या वरचे सगळे गुन्हे निकालात काढून जेलरने त्याला तो सुधारल्याचं आणि त्याच्या चांगल्या वर्तणुकीचं प्रमाणपत्र दिलं होतं .आज तो खऱ्या अर्थाने सन्माननीय नागरिक झाला होता. ते प्रमाणपत्र तो फ्रेम करून गॅरेजमध्ये लावणार होता त्याच्या सुटकेची रोझी ला काहीच कल्पना नव्हती. तिला सरप्राईज देण्यासाठी तो एवढ्या पावसात हि झपझप घरी निघाला होता. त्याला रोझीची आणि घराची ओढ लागली होती.



      सिग्नल हिरवा झाला तसा तो उजवीकडे वळला रस्त्यावर रहदारी फारशी नव्हतीच. तो वळला आणि त्याच्या पाठीवर जोरदार थाप पडली. त्याला काहीतरी टोचल्याची जाणीव झाली. सकाळी सकाळी आपल्याला ओळखणार कोण आहे म्हणून त्याने वळून पाहायचा प्रयत्न केला तेव्हा पाठीतून एक जीवघेणी कळ सणसणत डोक्यात गेली आणि पायातली शक्ती जाऊन भेलकांडत तो खाली कोसळला. रस्त्यावर जोरात आदळल्याने पाठीत वेदनेचा डोम उसळला, श्वास जड झाला .मदतीसाठी हाक मारायला त्याने तोंड उघडले तर तोंडातून उष्ण रक्ताचा एक मोठा लोट बाहेर पडला. पाठीतल्या वेदनेची जाणीव शरीरभर पसरत चालली.

           काही वेळापूर्वी रोझी बरोबरच्या आनंददायी भविष्याचा आपण विचार करत होतो त्या आठवणीने ही त्याची भयंकर वेदनेतून क्षणभर सुटका झाली. आपल्या गुन्हेगारी विश्वापासून दूर चांगल्या वाटेवर चालण्यासाठी तो घरी निघाला होता. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. हळूहळू तो बेहोशी चालला पण तेव्हा त्याला रोझी ची एकच गोष्ट राहून राहून आठवत होती, गुन्हेगाराने गुन्हे करणं सोडलं तरी ते जग गुन्हेगाराला विसरत नाही. त्याने कष्टाने डोळे उघडायचा प्रयत्न केला पण त्यात तो सफल झाला नाही. तेव्हा त्याने अलगद डोळे मिटले त्याला घेरणारी बेहोशी अधिकाधिक दाट होत होती. काही क्षणानंतर त्याला कशाची ही जाणीव उरली नाही कारण पावसात पडलेला, मृत्यूच्या आधीन झालेला तो देह सगळ्या जाणिवांच्या पलीकडे गेला होता.


 संगीता...

Post a Comment

0 Comments