दलित महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे निदर्शने

दलित महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ 

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे  निदर्शने

वेब टीम नगर - कोल्हापूर व जळगाव येथे दलित महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लोहकरे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, शहर उपाध्यक्ष प्रशांत डहाळे, विकी गारदे, चिनूलाल बुंदेले, दुर्वेश शेलार, गजानन शेंदुरकर, संभाजी आहेर, प्रितिश सूर्यवंशी, खेमराज बुंदेले, सचिन वाघमारे, लक्ष्मण साळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात चर्मकार समाजाच्या मुलीवर अत्याचाराच्या दोन घटना नुकत्याच घडलेल्या आहेत. त्यामध्ये एका मुलीचा प्राण गेलेला असताना आंदोलकांनी संताप व्यक्त करीत निषेध नोंदवला. चर्मकार समाजातील वीस वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी अत्याचार केला. त्या तरुणीला विवस्त्र करून तिचा व्हिडिओ काढण्यात आला. या आरोपींना पोलीसांनी अटक केली असून, सध्या ते पोलीस कोठडीत आहे. तरी अशा माणुसकीला काळीमा फासणार्‍या नराधमांवर कठोर शिक्षा करण्याची प्रमुख मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आली. तसेच जळगाव येथील विद्यार्थिनीचे अपहरण करून तीला कासोदा येथे नेत नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जबरदस्तीने विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जबर जखमी झालेल्या तरुणीला बसस्थानकाच्या मागे फेकून देण्यात आले. शेवटी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत माळवली. या घटनेमुळे जळगाव जिल्हासह संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे राज्यात चर्मकार समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी त्वरीत पाऊले उचलून उपाय योजना कराव्या व आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments