दिवाळी विशेष : बिझनेस मॅनेजमेंट गोष्ट : खेकड्याची चाल

 दिवाळी विशेष 

 बिझनेस मॅनेजमेंट गोष्ट : खेकड्याची चाल

 एकदा एक खेकडा आपल्याच नादात रमत गमत वाळूतून चालला होता. त्याच्या पायांमुळे वाळूवर छान नक्षी उमटत होती. तेवढय़ात समुद्राची एक मोठी लाट आली व तिने खेकड्याने काढलेली नक्षी क्षणार्धात पुसून टाकली. खेकड्याला या गोष्टीचा खूप राग आला. लाटेने खेकड्याला खूप समजावयाचा प्रयत्न केला की तो वाळूवर स्वत:च्या हालचालींचे जे चित्र अजाणतेपणे उमटवत आहे त्यामुळेच मासेमारी करणाऱ्या कोळ्याला त्याचा ठावठिकाणा मिळणार आहे व ते त्याच्या जिवावर बेतणार आहे. पण खेकडा ऐकण्याच्या मूडमध्ये होता कुठे? उलट तो लाटेवर रागावून किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला ! त्यामुळे व्हायचे तेच झाले, त्याच्या पायाची रांगोळी वाळूवर उमटत गेली व तो कोळ्याच्या नजरेत येऊन स्वत:चे प्राण गमावून बसला.

कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील अशा घटना घडत असतात. समुद्राच्या लाटा म्हणजे परिस्थितीने वेळोवेळी चुका निस्तरण्याची दिलेली संधी किंवा खेकड्याचा हट्ट म्हणजे सुधारण्याची संधी असूनदेखील व्यवस्थापनाने वेळोवेळी केलेल्या त्याच त्याच चुका असे जर समीकरण मांडले तर किंवा खेकड्याने काढलेली रांगोळी म्हणजे गतवैभव व ती पुसून टाकणारी लाट म्हणजे बदलाची सुनामी (ज्यात भूतकाळ किती रम्य असला तरी पार नष्ट होऊन जातो) असा विचार केला तर पुढील कथा वाचताना तुम्हाला योग्य तो संदेश मिळेल.

सोनी म्युझिक क्षेत्रामधील एक अग्रगण्य कंपनी! वॉकमन उद्योगात तर जवळजवळ मक्तेदारीच होती तिची; पण नवीन डिजिटल तंत्रज्ञान (एमपीथ्री, एव्हीआय वगैरे) आत्मसात करून घेण्याची कास न धरल्याने कंपनी म्युझिक क्षेत्रामध्ये रसातळाला गेली. मायक्रोसॉफ्ट व निन्तेंडो या प्रतिस्पर्धी कंपनींनी बाजारात आणलेल्या व्हिडीयो कन्सोलकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यानेदेखील सोनीचे खूप नुकसान झाले.

‘सीअर्स’ व के मार्ट या दोन्ही कंपनींनीदेखील वॉल मार्टच्या रणनीतीकडे दुर्लक्ष केले. ‘बिग बॉक्स, लो प्राईस’ या त्यांच्या रणनीतीमुळे ‘सीअर्स’ व के मार्ट या कंपन्यांना बॅकफूटवर जावे लागले.

आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्रात होणाऱ्या आमूलाग्र बदलांकडे दुर्लक्ष करणे याचा अंतिम परिणाम म्हणजे अत्यंत मेहनतीने वाळूत चितारलेल्या रांगोळीचे (रम्य, गौरवशाली भूतकाळाचे) लाटेच्या एका तडाख्याने (बदलाच्या एका सुनामीने) नामोनिशाण न उरणे हाच असू शकतो.

महत्त्वाकांक्षी ‘बोईंग ७८७ ड्रीम लायनर’चे नियोजन, बोईंगच्या डिझायनिंग टीमने पुन:पुन्हा (एकच चूक वारंवार) चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे हे विमान बाजारपेठेमध्ये यायला अक्षम्य उशीर झाला. त्यामुळे बोइंग कंपनीवर कधी काळी कामगार कपात करण्याची व तोटय़ातून बाहेर येण्यासाठी हातपाय मारायची नामुष्की ओढविली होती. खेकड्याने जशी वाळूवर चालण्याची चूक पुन:पुन्हा केली तशीच चूक, (चूक न सुधारण्याची चूक) बोईंगच्या व्यवस्थापनाने ड्रीम लायनरचे नियोजन करताना केली. काही वेळा कंपनी व्यवस्थापनाला वाटते की विलिनीकरण किंवा एक्विझिशनमुळेच कंपनीला सुगीचे दिवस येतील. एकदा असा निर्णय घेतला गेला की त्या निर्णयाचे काटेकोरपणे ‘स्वोट’ (रहडळ) विश्लेषण न करता त्या वाटेवर व्यवस्थापन चालू लागते. कंपनी व्यवस्थापनाच्या अहंकारामुळे, घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे कळत असूनदेखील पुढे जाऊन तो निर्णय बदलला जात नाही. हे वागणे म्हणजे आपला निर्णय योग्य की अयोग्य याचा विचार न करताच मार्गक्रमणा करणाऱ्या खेकड्यासारखेच असते.

लेखक - आकाश कोल्हे 



Post a Comment

9 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)