दिवाण पळशीकरांचा वाडा
नागर शैलीतील या मंदिराच्या प्रवेशव्दारावर गणपती, जय विजय ही दैवते कोरलेली असुन नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना असुन या सर्व बांधकामावर इस्लामी स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच उंच कळस असलेले रेखीव मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर दोन फ़ुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस किर्तीमुखाची पट्टी पाहायला मिळते. गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी हत्तीमुख बसवलेले आहे.
मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा मारताना मंदिराच्या बाह्यांगावर नक्षीदार मोर, हत्तीमुख, झुंजणारे हत्ती, लढाईस निघालेले सैन्य आणि सांडणीस्वार कोरलेले दिसून येतात मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून प्रशस्त सभामंडप असून या मंडपाच्या तीन बाजूंनी असलेल्या नऊ पायऱ्या या नवविद्या भक्तीची प्रतिके तर मंडपाचे नऊ फुट उंचीचे १८ खांब हे १८ पुराणाचे प्रतिक मानले जातात. मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षीकाम केले असून पुराणातील काही कथा त्यावर कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपात मध्यमागी दगडी कासव असुन गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर कोरीवकाम केलेले आहे. यात दरवाजाच्या दोन्ही बाजुंना रिध्दी-सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती असुन ६४ योगिनी आहेत. सभामंडपाच्या छतावर उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीकृष्ण व गोपिकाच्या रासविहाराच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यात उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मुर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेली विठ्ठलाची मुर्ती आहे. विठ्ठलमूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले असुन सिहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नराच्या मूर्ती कोरल्या आहेत.
लेखक, छायाचित्रकार - राजेंद्र बुलबुले
0 Comments