भ्रमंती
प्रवरानदीचे उगमस्थान अमृतेश्वर
भंडारदरा धरणापासून वीस की.मी अंतरावर प्रवरा नदीच्या उगमस्थळी पंथी शैलीने उभारलेल्या मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे.. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत.. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत.. अगदी वरती कीचकहस्त आहेत.. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत.. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.
अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद जमिनीलगत कोरीव आखीव-रेखीव अशी तिची रचना... एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर... पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..
लेखक , छायाचित्रकार - राजेंद्र बुलबुले
0 Comments