महिलांच्या प्रश्‍नासह सामाजिक विषय हाताळण्यास यशस्विनीच्या महिला कटिबध्द

महिलांच्या प्रश्‍नासह सामाजिक विषय हाताळण्यास

 यशस्विनीच्या महिला कटिबध्द 


रेखा जरे पाटील : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या भिंगार समन्वयकपदी 

रोहिणी वाघीरे यांची नियुक्ती

वेब टीम नगर - महिलांच्या प्रश्‍नासह विविध सामाजिक विषयावर कार्य करणार्‍या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या भिंगार समन्वयकपदी रोहिणी मच्छिंद्र वाघीरे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी सदर नियुक्तीची घोषणा केली. महिला व बाल कल्याण अधिकारी विजयामाला माने व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे यांच्या हस्ते वाघीरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यशस्विनीच्या विद्यार्थी समन्वयक मनिषा गायकवाड आदी संघटनेच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

रेखा जरे म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व त्यांचे न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड जिल्ह्यात कार्यरत आहे. तसेच विविध सामाजिक विषय हाताळून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या महिला कटिबध्द आहेत. महिला प्रभावशाली व शक्तीशाली असून, हेच ब्रिदवाक्य घेऊन संघटनेचे कार्य सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्याचे, विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षिततेचे व शासन व्यवस्थेतील प्रश्‍न हाताळून ते मार्गी लावले आहेत. तर भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांचा भंडाफोड करुन त्यांना धडा शिकवण्यासाठी देखील संघटना संघर्ष करीत आहे. 30 महिला वकिलांची नियुक्ती करुन पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्य देखील सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. महिला व बाल कल्याण अधिकारी विजयामाला माने यांनी महिलांसह सामाजिक प्रश्‍नात पुढाकार घेऊन यशस्विनी महिला ब्रिगेडने उभे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना रोहिणी वाघीरे म्हणाल्या की, सामाजिक कार्य करण्याची संधी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. चुल व मूलच्या पलीकडे जाऊन संघटनेचे कार्य सुरु आहे. महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी व वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या संघटनेच्या या कार्याने भारावले असून, संघटनेच्या ध्येय, धोरणानुसार कार्य करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments