मान्सूनच्या परतीच्या पावसाने भिगवण परीसराला झोडपले

 मान्सूनच्या परतीच्या पावसाने भिगवण परीसराला झोडपले  

ऊस तोडणीवर होणार परिणाम 

वेब टीम भिगवण: पावसाने झोडपले, तर तक्रार करायची कोणाकडे..? अशीच अवस्था भिगवण परीसरातील शेतकरी वर्गाची झाली आहे. शनिवार (दि.१०) रोजी मध्यरात्री सुरू झालेल्या परतीच्या पावसाने भिगवण परीसरातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या कारखान्याच्या ऊस तोडणीवर यांचा परिणाम होणार आहे. यामुळे ऊस तोडणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सुजला माती परीक्षण केंद्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ७१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिला होता. त्याप्रमाणे शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका मोठ्या प्रमाणात होता की, या परिसरातील ऊस, बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले आहे. तर, काही घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. पण दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. आज अखेर भिगवण परिसरात एकूण ७५९ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. पण, यावर्षी वेळेत पडलेल्या पावसामुळे सर्व पिके ही जोमात आली होती. यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास शनिवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसाने हिरावून घेतल्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरीवर्गातून होत आहे.


Post a Comment

0 Comments