"मोदी एक आपत्ती" या विषयावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गिरवले ऑनलाइन धडे

 "मोदी एक आपत्ती" या विषयावर काँग्रेस

 पदाधिकाऱ्यांनी गिरवले ऑनलाइन धडे 


वेब टीम नगर : प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर ऑनलाईन प्रशिक्षणाचा धडाका सुरू आहे. मोदी एक आपत्ती या विषयावरती महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाच्या वतीने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत ऑनलाईन धडे गिरवले आहेत. 

ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामशी रेड्डी त्याचबरोबर आमदार डॉ. सुधीर तांबे आ.  लहू कानडे यांच्या सह जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,  प्रदेश काँग्रेसचे आसिफ मुल्ला, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शहर आणि जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अमर खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

मोदी एक आपत्ती हा विषय घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांमध्ये जात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जागृती करणार आहेत. मोदी सत्तेत आल्यापासून या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली. युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोट्यावधी हातांचे काम गेले. जीएसटी सारख्या कुचकामी कर प्रणालीमुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले.

उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे या देशातील कामगार देशोधडीला लागला आहे. शेती विरोधी कायदा मुळे शेतकरी संकटात सापडला आहे. बाजार समित्यांच्या बरखास्त करण्याच्या केंद्राच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ घातले आहे. देशातील या स्थितीला मोदी जबाबदार आहेत अशी काँग्रेसची भूमिका आहे.

या सगळ्या विषयांवरती या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सर्वंकष माहिती देत प्रशिक्षित करण्यात आले. पक्षाच्या २७८ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. 

आगामी काळामध्ये हे शहर जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्व शहरात प्रभाग आणि जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर पदाधिकाऱ्यांसाठी स्थानिक पातळीवरती देखील अशाच प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम हाती येणार असल्याचे  ज्ञानदेव वापर यांनी सांगितले आहे. 


Post a Comment

0 Comments