बनावट मृत्यूचा दाखला देऊन घातला विमा कंपनीला १३ लाखांचा गंडा

 बनावट मृत्यूचा दाखला देऊन घातला  

विमा कंपनीला  १३ लाखांचा गंडा  


  सीआयडी मार्फत चौकशीची मागणी

वेब टीम श्रीगोंदे:एका विमा कंपनीला खोटी कागदपत्रे सादर करून कंपनीची १३ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आले असून यामधील सत्यता समोर आणण्यासाठी या सर्व प्रकाराची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी अमोल ढवळे यांनी केली आहे. दरम्यान अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून विमा रक्कम लाटणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

आपल्या निवेदनात ढवळे यांनी असे नमूद केले आहे की , श्रीगोंदे तालुक्यातील एक व्यक्ती नगरच्या सामान्य रुग्णालयात एका आजारावर उपचार घेत होती. त्या व्यक्तीच्या नातेवाईकाने एका विमा कंपनीची पॉलिसी उतरवत २४ जानेवारी २०१७ रोजी विमा हप्ता भरला. विमा हप्ता भरल्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये त्या आजारी व्यक्तीचे निधन झाले .फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात २०१७ रोजी सिद्धटेक येथे त्यांचा दशक्रिया विधी केला गेला. आपण करीत असणारी फसवणूक विमा कंपनीच्या लक्षात येऊ नये म्हणून त्या तरुणाने कर्जत तालुक्यातील एका खाजगी डॉक्टर कडून पैसे देऊन मृत्यूचा खोटा दाखला मिळविला व त्या मृत्यूच्या दाखल्याच्या आधारे मार्च २०१७ रोजी मृत्यू पावल्याची नोंद संबधित ग्रामपंचायतीमध्ये केली. या मृत्यूच्या दाखल्याच्या आधारे कंपनीची फसवणूक करून विमा रक्कम लाटल्याचे ढवळे यांनी अर्जात नमूद केले आहे.संबधित तरुणाच्या हालचाली लक्षात आल्यानंतर स्थानिक एजंटानी विमा कंपनीला तात्काळ सगळ्या घटना कळविल्या. मृत्यूचा दाखला खोटा घेतला असल्याचेही कंपनीला कळविले. खुद्द एजंटांनी ही माहिती दिल्यानंतर कंपनीने विमा क्लेम थांबविणे गरजेचे होते. परंतु विमा कंपनीने खातरजमा न करता संबधित व्यक्तीच्या खात्यावर विमा रक्कम अदा केली. या संपूर्ण बाबी घडवून आणण्यात मोठी साखळी कार्यरत असून विमा कंपनीला बनावट कागदपत्राच्या आधारे फसविले गेल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या संपूर्ण प्रकराची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी ढवळे यांनी केली आहे.दरम्यान यावर विमा कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.


Post a Comment

0 Comments