कायदा सुव्यवस्थेसाठी काँग्रेसपक्ष नेहमीच पोलीस ,जनतेच्याबरोबर

 कायदा सुव्यवस्थेसाठी काँग्रेसपक्ष नेहमीच पोलीस ,जनतेच्याबरोबर 

किरण काळे : शहरातील कायदा सुव्यवस्था बिहार सारखी असल्याची टिका.  

वेब टीम नगर :   शहरा बद्दलच्या  कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात किरण काळे आणि काँग्रेसचे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे त्याना शहराबद्दलची माहिती देण्यात आली. त्यात  नगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा आहे. त्याला मोठा सांस्कृतिक, आध्यात्मिक,  ऐतिहासिक वारसा आणि परंपरा आहे. परंतु मागील काही कालखंडापासून नगर शहरामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार मोठ्या प्रमाणावर राक्षसी आणि अघोरी रूप धारण करताना पाहायला मिळत आहे. राजकीय वरदहस्तातून आणि पार्श्वभूमीतून शहरामध्ये चालणारी संघटित गुन्हेगारी हा या शहरातील अत्यंत गंभीर विषय बनला आहे. यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे.

यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेल्या  कृष्ण प्रकाश (IPS), विश्वास नांगरे पाटील (IPS) यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय काम करत नगर शहरामध्ये आपला ठसा उमटविला होता. आजही नगरकरांना त्यांच्या चांगल्या कामाचे कायम स्मरण होत असते. आपल्याकडून देखील आम्हा नगरकरांची अशीच चांगल्या कामाची अपेक्षा नगरकर आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला आहे.

आपण पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला सलामी म्हणून की काय, नगर शहरामध्ये नगर शहराच्या नावलौकिकाला ठेच पोहोचवेल अशी लांच्छनास्पद घटना घडली. यातून नगर शहराचा पुन्हा एकदा बिहार झाला आहे की काय असा प्रश्न या शहराला पडला आहे. नगर शहराच्या बाजारपेठेतील भळगट कुटुंबियांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरु आहेत. या वादाचे पर्यावसन नगर शहराच्या बाजारपेठेतील भर मध्य वस्तीत दोन दिवसांपूर्वी दिवसा ढवळ्या हाणामारीमध्ये झाले. राजकीय पार्श्वभूमी आणि वरदहस्त असणाऱ्या गुंडांच्या टोळीने सुनील भळगट, सुशीलकुमार भळगट आणि कुटुंबियांच्या घरामध्ये सिनेस्टाईल प्रवेश करत घरातील पुरुषांसह स्त्रियांना मारहाण केली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या कृत्यामुळे शहराच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.  

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर देण्याचे काम आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले. सदर कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. ती देत असताना देखील कोतवाली पोलिस स्टेशनचे अपेक्षित सहकार्य त्यांना मिळू शकलेले नाही. फिर्यादी यांनी सहकुटुंब आपली देखील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेतली आहे.

घटना घडल्याच्या दिवशी रात्रीच्या वेळी फिर्यादी महिलेला कोतवाली पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले होते अशी महिती समोर आली आहे. हे कोणत्या कायद्याच्या चौकटी मध्ये बसते ? एकंदरीत कोतवाली पोलिसांची असणारी भूमिका ही राजकीय हस्तक्षेपामुळे या घटनेबाबत संशयास्पद आहे की काय असा सवाल यामुळे उपस्थित होतो. घडल्या प्रकारातील सर्व बाबींचा सखोल तपास करीत दोषीवर कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु अशा कोणत्याही प्रकरणामध्ये राजाश्रीत गुंडांनी शहरात धुडगूस घालत हैदोस घालणे या शहराच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य नाही. किंबहुना म्हणूनच सामान्य नगरकर, व्यापारी, उद्योजक, युवती, महिला यांच्या  हिताच्या दृष्टीने, आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या वतीने या मध्ये भूमिका घेतली आहे.

आमचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, या शहराचे भूषण असणारे स्व. सुवालालजी गुंदेचा यांचे चिरंजीव मनोज  गुंदेचा यांच्यावर देखील खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामनेवालेपार्टीने फिर्यादीमध्ये मनोज गुंदेचा यांच्याबाबतीत आरोप केले असून त्याबाबत मनोज गुंदेचा यांचे म्हणणे आहे की घडलेल्या घटनेच्या वेळेला, की ज्याबाबतचा उल्लेख फिर्यादी मध्ये केलेला आहे, त्यावेळी ते त्यांच्या कार्यालयामध्ये होते. त्याच सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, काँग्रेसचे पदाधिकारी असणारे आमचे सहकारी मनोज गुंदेचा यांच्यावरती दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा तात्काळ पोलीस तपास करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात याव्यात. यंत्रणेने सदर सीसीटीव्ही  फुटेज तपासावे आणि त्याच्या आधारे वस्तुस्थितीचा अभ्यास करत गुंदेचा यांचे नाव तात्काळ सदर फिर्यादीतून वगळण्यात यावे. सदर खोट्या गुन्ह्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी असणार गुंदेचा आणि कॉंग्रेस पक्षाची विनाकारण बदनामी होत आहे. ही बाब गंभीर आहे.

तसेच या घटनेची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी आणि तपास होण्यासाठी ती राजकीय दबाव विरहित होणे आवश्यक आहे. यासाठी डीवायएसपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या घटनेचा तपासी अधिकारी म्हणून नेमण्यात यावे. त्याचप्रमाणे सुनील भळगट आणि कुटुंबियांना झालेली मारहाण लक्षात घेता भविष्यात त्यांच्या जीविताला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी देखील त्यांनी पोलिस स्टेशनला याबाबत सूचित केले आहे. सबब या कुटुंबियांना, विशेषत: कुटुंबातील स्रियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आम्ही काँग्रेस पक्षाच्यावतीने आपल्याकडे करीत आहोत. नगर शहरामध्ये युवती, महिला असुरक्षित आहेत ही बाब पोलीस यंत्रणेला शोभनीय नाही.

सदर घडलेली घटना ही प्रातिनिधिक स्वरूपातील आहे असे आमचे मत आहे. नगर शहरामध्ये मागील पाच - सात वर्षांपासून राज्य आणि देशपातळीवरती चर्चा व्हावी आणि शहराच्या लौकिकाला काळीमा फासला जावा अशा पद्धतीच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. यातील काहीच घटना समाजात उघड होतात. मात्र अनेक घटनांचा आवाज अंधारात दाबला जातो अशी शहरात दबक्या आवाजात चर्चा आहे.

नगर शहरामध्ये सर्व सामान्य नागरिकांना, व्यापार्यांना, उद्योजकांना, गोरगरिबांना, युवतींना, महिलांना निर्भीडपणे जगता यावे यासाठी पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून असणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा वचक हा कठोरपणे निर्माण होण्याची गरज आहे. या शहराच्या, किंबहुना देशाच्या इतिहासात पोलिसांसमवेत घडलेल्या मागील काही वर्षांतील अप्रिय घटना पाहता, या शहरातील नागरिकांच्या सुरक्षितते बरोबरच पोलिसांच्या स्वतःच्या सुरेक्षेची देखील चिंता आम्हाला वाटते. जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख या नात्याने सदर जबाबदारी आपल्यावरती सरकारच्या वतीने असते. आपण याबाबतीत गंभीरपणे लक्ष घालून नगर शहरातील राजकीय वरदहस्तातून चालणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याकडे नम्रपणे मागणी आहे. 

नगर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा कायमच पोलीस प्रशासना आणि नागरिकांच्या बरोबर असेल, अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो.


Post a Comment

0 Comments