मनसेनं रस्त्याला खासदाराचे नाव देऊन केले आंदोलन

 

मनसेनं  रस्त्याला  खासदाराचे  नाव देऊन  केले आंदोलन 

 वेब  टीम नगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार मागणी करूनही नगरमधील काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नसल्यामुळे, या खराब रस्त्याला खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव     देऊन  मनसेने आंदोलन केले. या रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थितीला खासदार विखे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव या रस्त्याला दिल्याचे मनसेने स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याला निधी देणार, असे पत्र खासदार विखे यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले. परंतु आज पर्यंत विखे यांनी कुठलाही निधी या रस्त्या करीता दिलेला नाही. उलट दलितवस्ती निधीतून हा रोड दुरुस्ती होणार होता. त्या कामाची मंजुरी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी देण्यात आली होती. परंतु स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी हे काम उपायुक्तांवर दबाव आणुन ९ सप्टेंबर २०१९ रोजी पत्र देऊन बंद पाडले . दुसरीकडे खासदार या रोड ला निधी देणार होते, परंतु न मिळाल्याने रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अखेर आज मनसेने आक्रमक होत या रस्त्याला खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव देत आंदोलन केले.

हा रस्ता खासदार निधीतुन करावा किंवा दलित वस्ती निधीतुन करावा, हा महापालिकेचा प्रश्न आहे. पण महापालिकेने काटवन खंडोबा रोडचे काम ताबडतोब मार्गी लावावे, अन्यथा मनसेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. . या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, मनोज राऊत, गजेन्द्र राशिनकर, अॅड अनिता दिघे , विनोद काकडे, दिपक दांगट, पोपट पाथरे, अशोक दातरंगे, तुषार हिरवे, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश कोल्हाळ, अनिकेत जाधव, अंबादास गोटीपामुल आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments