सर्वाधिक बनावट नोटा दोन हजारांच्या


 

सर्वाधिक बनावट नोटा दोन हजारांच्या 

नोटबंदीचा उद्देश असफल 

वेब टीम नवी दिल्ली :केंद्र सरकारनं चार वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी केंद्र सरकारनं ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये बनावट नोटा पकडल्या जाण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तसंच २०१९ मध्ये देशात २५.३९ कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. तर २०१८ मध्ये १७.९५ कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्याच एनसीआरबीच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. ‘

केंद्र सरकारनं ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. तसंच या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक  अतिमहत्त्वाची फीचर असल्याचंही सांगण्यात आलं होतं. एनसीआरबीनुसार २०१९ मध्ये २ हजार रूपयांच्या ९० हजार ५६६ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २३ हजार ५९९ इतक्या २ हजार रूपयांच्या बनावट नोटा केवळ कर्नाटकातून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर गुजरातमधून १४ हजार ४९४ आणि पश्चिम बंगालमधून १३ हजार ६३७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या.


२५ ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या २०१९-२० च्या वार्षिक अहवालानुसार बँकेनं गेल्या आर्थिक वर्षात २ हजार रूपयांच्या एकाही नोटेची छपाई केली नाही. देशात सर्क्युलेशनमध्ये २ हजार रूपयांच्या नोटांमध्येही घट झाली आहे. २०१७,-१८ मध्ये ३.५ अब्ज नोटा चलनात होत्या. तर २०१९-२० मध्ये त्यात घट होऊन २.७३ अब्ज इतक्या झाल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या वर्षात १०० रूपयांच्या ७१ हजार ८१७ बनावट नोटा पकडण्यात आल्या. यापैकी सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ६७१ नोटा दिल्लीतून जप्त करण्यात आल्या होत्या. तर १६ हजार १५९ नोटा गुजरातमधून आणि ६ हजार १२९ नोटा उत्तर प्रदेशातून जप्त केल्या होत्या.

Post a Comment

0 Comments