डॉक्टर कोविड सेंटरमध्ये ड्युटीवर..... अन घरी झाली चोरी ....

 डॉक्टर कोविड सेंटरमध्ये ड्युटीवर.....  अन घरी झाली चोरी .... 

वेब टीम नगर : कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या डॉ. संदीप देठे यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केले. काल, सोमवार दुपारी चार ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली.अपार्टमेंटमधील डॉ. देठे यांचा फ्लॅट बंद होता. ते खडकवाडी येथील आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. सोमवारी ते तेथे ड्युटी करून कर्जुले हर्या येथील कोविड सेंटरवर ड्युटीला गेले होते.त्यानंतर ते आपल्या फ्लॅटवर दुपारच्या सुमारास परतले व पुन्हा सायंकाळी चारच्या सुमारास ते ग्रामीण रुग्णालय येथे ड्युटीसाठी निघून गेले. मात्र त्याच दरम्यान त्यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातून पाच हजार रुपये रोख व सोने-चांदीचे दागिने असा एकूण पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देत कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. 


Post a Comment

0 Comments