तोतया अधिकारी म्हणून चक्क पोलिसांनाच घातला गंडा- युवकास अटक
वेब टीम कर्जत दि. ११- आधी पाहुणचार मग आपलीच फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची नामुष्की कर्जत पोलिसांवर आली. गेल्या अडीच महिन्यापासून पोलिसांच्या सोबत लगट करीत असलेला योगेंद्र सांगळे याने आपण पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती दिली होती. त्याचा बनाव उघड झाल्याने कर्जत पोलिसांनी त्यास अटक केले ल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राशीन ता.कर्जत येथील युवक योगेंद्र उपेंद्र सांगळे याने गेली अडीच महिन्यांपासून आपण पंतप्रधान कार्यालयामध्ये सीनियर एक्झिक्यूटिव्ह म्हणून कार्यरत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला ट्रेन आणि विमान प्रवास बंद असल्याने जाता येत नाही. आपण युपीएससी परीक्षेत यश मिळवले असून कलेक्टर आयएएसचा आपला इटरव्ह्यू ३ तारखेला आहे असे व्हाट्सअप आणि फेसबुकद्वारे सर्वाना कळविले होते. या काळात सांगळे यांने राशीन येथील पोलिसांशी मैत्री करीत येथेच्छ पाहुणचार घेतला. मात्र ३ तारीख उलटून ही तसेच लॉकडाऊन शिथील झाला तरी सदर युवक गेला नाही म्हणून कर्जत पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती बाहेर काढली असता त्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. सदर युवक हा आयएएस परीक्षेत फेल झालेला असून तो पीएमओ कार्यालयात अथवा कोणताही शासकीय पदावर कार्यरत नाही हे लक्षात येताच पोलिसांनी त्यास तात्काळ अटक केली. यासह त्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला. योगेंद्र सांगळे यांनी आणखी तोतयागिरी करून कोणाची फसवणूक केली आहे का ? याबाबत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड अधिक माहिती घेत आहेत. जर कोणाची फसवणूक झाली असेल तर अशा नागरिकांनी पोलीस निरीक्षक- कर्जत, मो 9823612245 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी केले आहे. कर्जत पोलिसांनी सांगळे यास अटक केली असून त्यावर भादवी कलम १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश माने करीत आहे.
0 Comments