कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही


कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

राहुल द्विवेदी  :  सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका

प्रतिबंधात्मक उपाययोजना , पूर्वकाळजी महत्वाची

      वेब टीम नगर, दि. ७ - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा अद्याप राज्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. प्रतिबंध आणि पूर्वकाळजी हाच या आजारावर मात करण्याचा सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने नागरिकांनी काळजीचे कारण नाही, असे ते म्हणाले.

            येथील नियोजन समिती सभागृहात आज जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, वैद्यकीय विभागाचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील महत्वाच्या देवस्थानांचे प्रमुख, जिल्ह्यातील महत्वाच्या हॉस्पिटल्सचे वैद्यकीय अधिष्ठाता, शिर्डी विमानतळाचे अधिकारी, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय प्रमख अशा सर्वांची कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या पूर्वकाळजी आणि नागरिकांसाठी करावयाच्या मार्गदर्शनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉ. शेळके आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपण जिल्हा रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. मात्र, नागरिकांनी स्वताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे.
            नवीन करोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेची निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी ,खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया ,काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. या आजारास जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ असे नाव दिले आहे. करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.
            करोना आजार होऊ नये यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात नियमितपणे साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, नियमबध्द जीवनशैलीचा अवलंब करा. स्वत:हून कोणताही उपचार करु नये, डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच उपचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            श्वसनास त्रास होणा-या व्यक्ती आणि हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे. अशा व्यक्तींनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करुन घ्यावेत, असे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
 बुथ हॉस्पिटल, अहमदनगर येथे आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक  शंकासमाधानासाठी उपलब्‍ध करण्‍यात आला आहे.  याशिवाय  जिल्‍हा  सामान्‍य रुग्‍णालय, अहमदनगर येथे करोना नियंत्रण कक्ष स्थापन ( 0241-2431018 ) करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत आहे. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
यावेळी उपस्थितांना डॉ. नागरगोजे यांनी सादरीकरणाद्वारे करोना विषाणू संसर्ग आणि उपाययोजनांबाबतची माहिती दिली. तसेच विविध यंत्रणांनी करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहितीही देण्यात आली.                      

Post a Comment

0 Comments