संस्कृती रक्षण , संवर्धनात लोककला व परंपरांचा मोठा वाटा
प्रा. डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे - गोदावरी प्रकाशनाच्या चार पुस्तकांचे प्रक़ाशनवेब टीम नगर,दि. ३ - लोककला आणि लोकपरंपरा यांनी काळाच्या बदलत्या प्रवाहामध्ये संस्कृतीचे रक्षण व संवर्धन केले. आपली संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. लेखक प्रभाकर मांडे यांनी हे व्रत जपले, त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक साहित्यात याचा प्रत्यय येतो. त्यांच्या लेखन कौशल्याच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे. आज प्रकाशित होत असलेली ही पुस्तके लेखकांचे साहित्य हे नवीन पिढीला अभ्यासक ठरतील, असे उदगार र प्रा.डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे त्यांनी काढले.
गोदावरी प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन व अमृतमहोत्सवी लेखक अरूण मांडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘लोकपरंपरेतील खेळ’ हे लेखक प्रभाकर मांडे व लेखिका संज्योत महाजन, ‘लोक चित्रकला’ लेखक प्रभाकर मांडे व अंजली दिवेकर, ‘भाकिते’ लेखक प्रभाकर मांडे व वृषाली मांडे, ‘हिंदूंचे धर्मचिंतन’ लेखिका . गौरी डोखळे या गोदावरी प्रकाशनाच्या चार पुस्तकांचे प्रकाशन डॉ.अरुण मांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वयाची आणि पुस्तकांची पंच्याहत्तरी पूर्ण करणार्या नाटक, नभोनाट्य आणि विविध विषयांवरील लेख लिहिणार्या तसेच साहित्य क्षेत्रातील अनेकविध पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. अरुण मांडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार यावेळी ७५ दिव्यांनी ओवाळून करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर मांडे यांचे लोकसाहित्य व परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान आहे तसेच डॉ.अरुण मांडे हे लेखन व साहित्य क्षेत्रातील दीपस्तंभ असून या दोघांनाही पुढील काळात दीर्घायुष्य मिळावे अशा शुभेच्छा सहस्रबुद्धे यांनी दिल्या. समाजाच्या जडणघडणीमध्ये साहित्याचे आणि पुस्तकांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. लिला गोविलकर यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेतून आयुष्यभर लेखन केल्याची भावना डॉ. अरुण मांडे यांनी व्यक्त केली. पुस्तकाच्या लेखिकांनी पुस्तक लिहिण्यामागील आपला हेतू यावेळी समजावून सांगितला.
अशोक बकोरे यांनी डॉ.मांडे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. अविनाश मांडे व शरद मांडे यांच्या हस्ते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यशश्री कुलकर्णी यांच्या सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विशाखा गंधे यांनी सूत्रसंचालन केले. गोदावरी प्रकाशनाच्या वृषाली मांडे यांनी आभार मानले. मधुरा डांगे यांच्या संपूर्ण वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी नगरच्या साहित्य नाट्य व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments