पालकत्व, सुरक्षा आणि प्रेम हाच परिपूर्ण बाल विकासाचा आधार- ॲड. प्रवीण घुगे

पालकत्व, सुरक्षा आणि प्रेम हाच 

परिपूर्ण बाल विकासाचा आधार- ॲड. प्रवीण घुगे

वेब टीम नगर,दि. ३- पालकत्व, सुरक्षा आणि प्रेम हाच परिपूर्ण बाल विकासाचा आधार आहे त्यासाठी विविध बाल सेवी संस्थामध्ये  राहणाऱ्या हक्कवंचित  बालकांसाठी  प्रतीपालकत्व आणि प्रायोजकत्व मिळवून  देण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहील, अशी ग्वाही   महाराष्ट्र राज्य बालहक्क सरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली.
     पुणे येथे डेक्कन जिमखाना सभागृहात स्नेहालय संस्था आणि महाराष्ट्र राज्य बालहक्क सरक्षण आयोग यांनी  ‘अनाथ बालकांचे कुटुंबासमवेत संगोपन' या  विषयावर  परिषदेच्या  आयोजन केले होते. आशियातील या विषयावरील ही पहिलीच परिषद पुणे येथे आयोजिण्यात आली.
      बालकांचा विकास हा कुटुंबाशी जोडलेला असतो. कुटुंबातील आपलेपणाची उब आणि त्याचे प्रगटीकरण यांमुळे बालकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांचे मानसिक सक्षमीकरण शक्य आहे. त्यासाठी बालगृहातील अनाथ आणि इतर बालकांना काही काळासाठी घरचे वातावरण देण्यासाठी समाजातील कुटुंबांनी पुढे यायला हवे असेॲड. घुगे म्हणाले. ‘नवरात्री उत्सवात काही अनाथ मुलिंना आम्ही आमच्या घरी राहायला नेले.कुटुंबात राहण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. निश्चितच त्यांच्या अनुभवाने आम्ही देखील समृद्ध झालो.’ समाजातील कुटुंबांनी पुढे येऊन या बालकांचे प्रतीपालकात्व किंवा प्रायोजकत्व स्वीकारावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
      ‘सेरी’ या बालहक्क आणि बालकांचे कौटुंबिक संगोपन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अंतरराष्ट्रीय संस्थेचे भारतातील संचालक इयान आनंद उपस्थित होते. त्यांनी या विषयावर उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले . नेदरलँड्स येथील बालहक्क या विषयातील  कार्यकर्त्या फ्लोरेंस कोएन्द्रिक यांनी कुटुंब आधारित संगोपनाची संकल्पना उलगडली. जॉयस कोनोली या स्नेहालय युकेच्या विश्वस्त आहेत.त्यांनी  बालकांचे कुटुंबातील संगोपन आणि संस्थांमधील संगोपन आतील फरक विशद केला. युनिसेफ चे विकास सावंत यांनी देखील युएन ची या विषयीची भुमिका मांडली.
       स्नेहालय संस्थेच्या पुढाकाराने २०१९ च्या राष्ट्रीय बाल धोरणास अनुसरून  ‘काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांस 'कुटुंबआधारित' संगोपन पुरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्याची पहिली Sponsorship and Foster Care Approval Committee (SFCAC)   देखील स्थापन करण्यात आली. या कामी जिल्हा महिला बालविकास विभाग संलग्न संस्था म्हणून काम करणार आहे. जिल्हास्तरावर 'कुटुंब आधारित संगोपन कार्यक्रमाची' बांधणी करत असताना या संपूर्ण प्रक्रियेचे 'दस्तऐवजीकरण' देखील स्नेहालय करत आहे, जे इतरांसाठी पथदर्शी ठरेल.
       परिषदेसाठी बालहक्क आणि पुनर्वसन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचे ५०  प्रतिनिधी तसेच महिला आणि बालके या क्षेत्राशी संबंधित शासकीय विभाग, बालकल्याण समिती, महिला व बालविकास विभाग, समन्वित बालविकास योजना,आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      परिषद यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक महेश मरकड, स्नेहालयाचे वरिष्ठ सहसंचालक  अनिल गावडे, सचिव राजीव गुजर, प्रमुख पालक मिलिंद कुलकर्णी,  मीरा क्षीरसागर, विश्वास आणि नीलिमा लोकरे, शशिकांत सातभाई, शुभांगी कोपरकर, डॉ.प्रकाश शेठ,किरीटी मोरे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments