विसंवादातून सरकार कोसळेल -चंद्रकांत पाटील



विसंवादातून सरकार कोसळेल -चंद्रकांत पाटील 

वेब टीम शिर्डी ,दि. २- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भीमा कोरेगावचा तपास केंद्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतात तर पवार त्याला विरोध करतात, यावरून आणि इतरही बाबीं वरून  या तिन्ही पक्षांत एकवाक्यता नाही. विसंवादामुळेच हे सरकार आपोआप कोसळणार आहे. भाजपला हे सरकार पाडण्याची गरज नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती. तेव्हा घेतलेल्या निर्णयात शिवसेनेचा काहीच संबंध नव्हता का, असा सवाल उपस्थित करत विद्यमान ठाकरे सरकार पूर्वीच्या सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न करीत आहे. 3 पक्षांच्या असलेल्या या सरकारमध्ये केवळ राष्ट्रवादी सरकार चालवत आहे. या तिघांत मतभिन्नता असल्याने हे सरकार आपोआप कोसळणार आहे. शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्र आहेच; पण विद्यमान सरकारमध्ये शिवसेनेचे स्थान काय, हाच प्रश्न जनतेला पडलेला आहे. शरद पवारांना भाजपबरोबर खुन्नस काढण्यासाठीच शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक़ ठेवून निर्णय घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली.
देशातील मुस्लिमांचा वापर राजकारणासाठीच केला जात असून, आरक्षणाचे लॉलीपॉप दाखवून त्यांना भाजपविरोधात रस्त्यावर उतरवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. नारायण राणे भाजपचे नेते आहेत. त्यांनी जर शिवसेनेवर टीका केली तर भाजपच्या सुसंस्कृतपणावर बोट ठेवायचे आणि शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून वाट्टेल ती गलिच्छ भाषा वापरत असतील, तर त्याला सुसंस्कृत मानायचे का, असा प्रतिसवाल उपस्थित करत यापुढे आमच्या सुसंस्कृतपणाचा अंत पाहू नका. आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments