वादग्रस्त वक्तव्यावर इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी

वादग्रस्त वक्तव्यावर  इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी

वेब टीम शिर्डी,दि. १८- अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या
वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे.

मागील आठ दिवसांपासून या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. मात्र प्रकरण आणखी जास्त चिघळण्याआधी इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त करत, यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment

0 Comments