हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज संपली ;न्याय मिळेपर्यंत मृतदेह स्विकारणार नाही

हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज संपली ;

न्याय मिळेपर्यंत मृतदेह स्विकारणार नाही 

वेब टीम हिंगणघाट, १०- माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६. ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा लोकांमध्ये राग आहे. या पीडित तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नराधमाला तातडीने शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या सात दिवसांपासून ही तरुणी मृत्यूशी लढत होती. यावर तिच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हिंगणघाटमध्ये मृत पीडितांच्या नातेवाईकांच ठिय्या आंदोलन छेडलं आहे. लेखी स्वरुपात आश्वासन द्या, अशी मागणी सरकारकडे केली जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर होती. हळूहळू तिच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. ह्रदय, यकृत, मूत्रपिंड सर्वच अवयव निकामी झाल्याने पीडितेचा मृत्यू ओढवला. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने या पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकारने घेतला होता. पीडितेसाठी रुग्णालयात स्पेशल कक्ष तयार करण्यात आला होता व त्या ठिकाणी दोन डॉक्टर व ७ नर्सेसची २४ तास नेमणूक करण्यात आली होती. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून  शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिची झुंज अखेर संपली.
आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही’ असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. तसेच ‘मुलाला आमच्या स्वाधीन केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही. त्याला देखील जिवंत जाळा. त्याला जिवंत जाळल्याशिवाय मुलीच्या आत्माला शांती मिळणार नाही’ अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच ‘मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा’ असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments