महाविद्यालय हे शिंपल्यासारखे असते, तुम्ही मोती बनून बाहेर पडा


महाविद्यालय हे शिंपल्यासारखे असते, तुम्ही मोती बनून बाहेर पडा

शर्वरी जमेनीस -न्यू आर्टस्, कामर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण
वेब टीम नगर,दि. ६  - आजच्या युगात विद्यार्थांसाठी अनेक वाटा उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला जे करण्यात समाधान व आनंद मिळतो त्यात प्रामाणिकपणाने कष्ट करा. महाविद्यालय हे शिंपल्यासारखे असते, त्यात तुम्ही पाण्याचे थेंब बनून सहभागी होता, तेथून तुम्ही मोती बनून बाहेर पडले पाहीजे असे प्रतिपादन सुप्रसिध्द् अभिनेत्री व कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी केले. न्यू आर्टस्, कामर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण संमारंभ प्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष  नंदकुमारजी झावरे पाटील हे होते.
या प्रसंगी जमेनीस म्हणाल्या की शिक्षण हे महत्वाचं आहेच, ते आपल्याला आत्मनिर्भर बनवते. परंतु काम करीत असताना अपयशही वाट्याला येऊ शकते. त्या अपयशाला धैर्याने सामोरे जायचे असेल तर आपल्याकडे दुसरी योजना तयार असायला हवी, जेणेकरून आपल्याला नैराश्य गाठणार नाही. मी माझे पहिले प्रेम म्हणून शास्रीय नृत्याकडे पाहते, अभिनय करणे ही माझी दुसरी योजना आहे. अभिनय क्षेत्रात मर्यादा असतात, नृत्य कलेला मात्र मर्यादा नाहीत. शास्रीय नृत्य हे फक्त मनोरंजनासाठी नसून ती एक साधना आहे. मी टेलिव्हीजनवर मालिकांमध्ये भूमिका केल्या असत्या तर मला प्रसिध्दी, पैसा मिळाला असता परंतु नृत्यापासून दूर गेले असते. मी मात्र नृत्य कलेवर प्रेम केले आणि प्रामाणिक राहीले. त्यामुळेच मला अनेक सन्मान प्राप्त झाले व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात  नंदकुमार झावरे पाटील म्हणाले की न्यू आर्टस महाविद्यालयामुळे संस्थेचा नावलौकीक केवळ राज्यातच नाही तर देशभर झाला आहे. महाविद्यालय हे यंदा सुवर्ण महोत्सव साजरे करीत असताना तेथून बाहेर पडलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. तसेच ते पद्मश्री किताबाने देखील सन्मानित होत आहेत. त्यामुळे संस्थेचा मुळ हेतू साध्य होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागातर्फे संस्था गीत सादर करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले. तर संगीत विभागप्रमुख प्रा. निलेश खळीकर यांनी पाहूण्यांचा परीचय करून दिला. महाविद्यालायाचे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. एल. आर. हराळ यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा वार्षिक अहवाल मांडला. महाविद्यालयातील यशस्वी गुणवंत प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब सागडे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. आर. जी. कोल्हे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अ.जि.म.वि.प्र.स. संस्थेचे उपाध्यक्ष  रामचंद्रजी दरे , सचिव जी . डी. खानदेशे , ज्येष्ठ विश्वस्त दिपलक्ष्मी म्हसे, मुकेशदादा मुळे, सदस्य जयंतराव वाघ, अरुणाताई काळे, निमाताई काटे, अलकाताई जंगले, वायकर , प्राचार्य खासेराव शितोळे, महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंदरकर, प्रबंधक  बबन साबळे, अधिक्षक आर. के. सातपुते, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आर. बी आठरे, उपप्राचार्य प्रा, सुभाष ठुबे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments