विज्ञान न वाढण्याची कारणे आपल्यातच शोधा -डॉ . नारळीकर


 विज्ञान न वाढण्याची कारणे आपल्यातच शोधा -डॉ . नारळीकर 

 वेब टीम पुणे,दि. २९ - शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान हे मंत्रासारखे पाठ करून शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थी गुण मिळविण्यापुरते विज्ञान शिकतात. मोठे झाल्यावर त्यांचे कुतूहल कमी होत जाते, त्यामुळे विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपण आपल्यातच शोधायला हवे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
विज्ञान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील आयुका संस्थेतमध्ये शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. नारळीकर आणि आयुकाचे शास्त्रज्ञ प्रा. सोमक रायचौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

अवकाशात तारे असताना अवकाश काळे का दिसते ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, अवकाशात जेवढे तारे आहेत तेवढे अवकाश प्रकाशमान करण्यासाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे ते तारे आपल्याला दिव्यांसारखे दिसतात. तार्‍यांच्या रंगाबाबत बोलताना ते म्हणाले, भौतिक शास्त्रानुसार रेडिएशनच्या तपमानावरून त्या तार्‍याचा रंग ठरत असतो. आपल्याला लाल रंग सर्वात जास्त तप्त असतो असे वाटते, परंतु विज्ञानानुसार निळा रंग हा लालपेक्षा अधिक तप्त असतो. सूर्याबाबत बोलताना ते म्हणाले, सूर्यासारखे अनेक तारे आकाशगंगेत आहेत. एका टप्प्यानंतर सूर्यात अनेक बदल होतील. त्याचे तपमान बदलेल, तसेच त्याचा आकारही बदलण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात विज्ञान जास्तीत जास्त कसे पोहचायला हवे ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, विज्ञान सर्वांपर्यंत पोहचायला हवे, केवळ शहरांपुरते ते मर्यादित असता कामा नये. विविध संस्थांकडून मदत घेऊन गावांमध्ये विज्ञान सेंटर सुरू करता येऊ शकतील. बर्मुडा ट्रँगलमध्ये अनेक विचित्र गोष्टी घडतात, असे सांगितले जाते; परंतु तिथे काही नसून त्या ठिकाणी होणारे अपघात इतर ठिकाणीसुद्धा होऊ शकतात, असे बर्मुडा ट्रँगलजवळ राहणार्‍या आपल्या मित्राने सांगितल्याचेही नारळीकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शुक्रवारी आयुका, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, आघारकर संशोधन संस्था, भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्था सी-डॅक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायन शास्त्र विभाग व सायन्स पार्क या वैज्ञानिक संस्थेतील विविध प्रदर्शने, फोकाल्ड दोलक, यान, विज्ञानाची गंमत सांगणारे विविध प्रकारांची प्रयोग, खगोल विज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांची रमून गेली होती. शहरातील विविध प्रमुख संस्थांतर्फे प्रयोगांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रदर्शन, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
सी-डॅकतर्फे परम महासंगणक, सॉफ्टवेअर निगडित विविध प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) मध्ये प्राणी, जीवाणू, विषाणू आदींच्या पेशींसंबंधीची माहिती प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. आघारकर संशोधन संस्थेत जीवाश्म, औषधी झाडे, ड्रोसोफिलासह विविध प्रदर्शन भरविण्यात आले. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्थेत हवामानशास्त्राशी निगडित विविध प्रदर्शन, प्रयोगशाळेची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments