नाटय़ संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण


 

नाटय़ संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले  होते उपस्थित

वेब टीम मुंबई,दि. २८- ‘मराठी नाटकातील हसऱ्या-दुखऱ्या भावभावना व्यक्त करणारे दोन चेहरे, डोक्यावर गेट वे ऑफ इंडिया, वाटचालीतील सातत्य दर्शवणारी शंभर संख्या, त्याला तिरंग्याचा हलका स्पर्श’, असे असणार आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे बोधचिन्ह. त्याचे अनावरण गुरुवारी माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिर येथे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.
या वेळी संमेलनाच्या उद्घाटन सई परांजपे, ९९व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, खा. सुनील तटकरे आणि परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हजर होते. मिलिंद प्रभू यांनी बोधचिन्हाचे रेखाटन केले आहे.
नाटय़ संमेलनाचे उद्घाटन २७ मार्चला सांगलीत होणार आहे. मात्र तत्पूर्वी तंजावर येथे जाऊन मराठीतील आद्य नाटककार व्यंकोजी राजे यांना अभिवादन केले जाईल. तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले हेसुद्धा गुरुवारी उपस्थित होते. सुबोध भावे, चिन्मयी सुमित, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, अभिजीत केळकर, अशा मराठीतील आघाडीच्या कलाकारांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘मराठीच्या इतिहासात अखंड स्मरणात राहील असे नाटय़संमेलन व्हावे’, अशी अपेक्षा शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
 अनावरण कार्यक्रमानिमित्त यशवंत नाटय़ मंदिर येथील वातावरण मंगलमय झाले होते. चाफ्याचे फूल देऊन सनई आणि पेटीच्या सुरात पाहुण्यांचे स्वागत केले जात होते. कार्यक्रमाची सुरुवातही नांदी गाऊन झाली. यापूर्वी मुलुंड येथील कालिदास नाटय़गृहात झालेल्या ९८व्या नाटय़ संमेलनाची चित्रफीतही लावण्यात आली होती. ‘मराठी रंगभूमी देशभरातील नाटकांचे प्रतिनिधित्व करते असे चित्र शंभराव्या नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने निर्माण व्हावे,’ अशी आशा प्रेमानंद गज्वी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments