वातावरणात विचित्र बदल


वातावरणात विचित्र बदल 

मुंबईत ऊन,विदर्भात गारपिटीची शक्यता, कोकण वगळता इतरत्र थंडी

वेब टीम मुंबई ,दि. २८- राज्याच्या तापमानात सध्या झपाटय़ाने बदल होत आहेत. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणामध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण विभाग वगळता राज्याच्या इतर भागांत सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याने थंडी पुन्हा अवतरली आहे.
राज्यात सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने पुन्हा येऊ लागले आहेत. किनारपट्टीच्या भागात मात्र उष्ण वाऱ्यांचे प्रवाह आहेत. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी वाढला आहे.
मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १६ ते १७ अंशांवर गेलेले किमान तापमान दोन दिवसांपासून १२ ते १३ अंशांवर आले आहे. कमाल तापमानही सरासरीखाली आल्याने उन्हाचा चटका घटला असून, रात्री बोचऱ्या वाऱ्यांचा अनुभव येत आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ातही किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी खाली आल्याने चांगलीच थंडी जाणवते आहे. विदर्भातही सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा कमी झाला आहे. ३६ अंशापार गेलेले किमान तापमान ३४ अंशांवर आल्याने उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो आहे.
१७ फेब्रुवारीला मुंबई आणि परिसरातील तापमानाचा पारा अचानक चढला होता. त्यानंतर काही दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात गुरुवारी दोन अंशाची वाढ झाली. शहराच्या मानाने उपनगरात पारा चढा राहीला. उपनगरात सर्वत्रच कमाल तापमान ३५ अंशाच्या वर होते, तर घाटकोपर आणि बोरिवली (पूर्व) येथे ३८.४० आणि ३८.६९ अंश तापमान नोंदविण्यात आले. मुंबईतील गुरुवारचे कमाल तापमान हे गेल्या दहा वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी २०१२ आणि २०१५ मध्ये कमाल तापमान ३८ अंशपेक्षा अधिक होते.
आंब्याला उष्माघात 
वाढत्या तापमानाचा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. कातळावरीलच नव्हे तर किनारी भागातील बागांना उन्हाचे चटके बसले आहेत. उन्हामुळे कैरी पिवळी पडून गळू लागली आहे. हे प्रमाण सर्वाधिक असल्याने यंदा उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. हा आंब्यावरील उष्माघातच असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
Post a Comment

0 Comments