निलेश साबळेंच्या स्वप्नातलं घर ......

निलेश साबळेंच्या स्वप्नातलं घर ...... 

वेब टीम मुंबई,दि.२४ - ‘कसे आहात सगळे, हसताय ना..? हसायलाच पाहिजे..’असं आपुलकीने विचारणारा सूत्रसंचालक म्हणजे डॉ. निलेश साबळे. ‘फू बाई फू’ ते ‘चला हवा येऊ द्या’ या प्रवासामध्ये तो प्रेक्षकांसमोर सूत्रसंचालक म्हणून आला. निलेश केवळ उत्तम सूत्रसंचालकच नाही तर लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम कलाकारही आहे. विविध भूमिका पार पाडत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या या कलाकाराने कित्येक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. निलेशने मुंबईमध्ये घर घेत त्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची शान वाढविणारा अभिनेता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निलेश आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करत कुशलने निलेशच्या स्ट्रगल काळातील काही आठवणीही थोडक्यात शेअर केल्या आहेत.
“काही वर्षांपूर्वी पनवेलच्या बस स्टॉपवर रात्र काढणाऱ्या मित्राला त्याच्या मुंबईल्या स्वत:च्या घरा साठी खुप खुप शुभेच्छा. डॉ .  तुझं अभिनंदन . आणि जिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्या गौरीच खरं कौतुक”, असं कॅप्शन देत कुशलने निलेशला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे कुशलच्या या पोस्टवरुन निलेशने स्ट्रगल काळात बऱ्याच रात्री पनवेलच्या बस स्टॉपवर घालवल्याचं यातून दिसून येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून निलेश साबळेने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो होम मिनिस्टर, फू बाई फू या रिॲलिटी शोमध्येही झळकला. तसंच ‘नवरा माझा भवरा’, ‘बुद्धीबळ’, ‘एक मोहर अबोल’ या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.

Post a Comment

0 Comments