महाविद्यालयात निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात :शरद पवार
वेब टीम मुंबई,दि. २३-“देशाचं भवितव्य घडवण्याची युवकांमध्ये ताकद आहे. त्यामुळे तरुणांना संधी मिळाली पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुका सुरु करायला हव्या. त्यामुळे कॉलेज तरुणांना संधी मिळेल. पण त्यापूर्वी काळजी घ्यावी,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
युवकांना देशाच्या प्रगतीसाठी योग्य दिशेने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. या उद्देशाने मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘संवाद साहेबांशी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मार्गदर्शनपर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीला त्यांनी सडेतोड उत्तर दिली.
यावेळी शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. “चंद्रकांत दादांना माझ्यावर पीएचडी करायची असेल, तर त्यांना १० ते १२ वर्षे वेळ काढावा लागेल,” असे शरद पवार म्हणाले.
“शैक्षणिक दृष्टीने पीएचडी प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने पीएचडी प्रकरणी गांभीर्याने दखल घ्यायला हवी. याबाबचा निर्णय लवकर घ्यावा. तसेच वर्ष वाया जाऊ नये याला प्राधान्य दिले पाहिजे.
सध्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा नाहीत असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, डॉक्टरवर खूप जास्त ताण असतो. रुग्ण आणि डॉक्टर गुणोत्तर प्रमाणाचा विचार करायला हवा. शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या समस्या केंद्रात मांडल्या आहेत.
मी कॉलेजच्या दिवसात अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो. महाविद्यालयातील निवडणुका कशा जिंकायच्या यावर विचार करायचो. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात यामुळेच झाली. जुन्या मित्रांना अजूनही भेटतो,” असेही शरद पवार म्हणाले.
“मी २२ फेब्रुवारीलाच पहिली निवडणूक जिंकली होती. पूर्वीच्या कालखंडात यात खूप अभ्यास करावा लागायचा. यानंतर पक्षनेत्याची जबाबदारी अंगावर पडली.”
“चढत्या क्रमाने जरी वर गेलात, यशस्वी झालात तरी देखील पाय जमिनीवर हवेत. एकंदर परिस्थिती लक्षात घ्यायची. कधीही ना उमेद व्हायचं नाही,” असा सल्लाही पवारांनी विद्यार्थ्यांना दिला.
“अभ्यासक्रमात बदल व्हायला हवा. त्यात बदलाची आवश्यकता आहे. सुसंवाद असायला हवा,” असेही शरद पवार म्हणाले.
“लोकशाहीत काहीही घडू शकतं. उत्तरप्रदेशात नेते कसे निवडून आले ते पाहा. चुकीच्या लोकांना बाजूला ठेवायला हवं,” असेही शरद पवार म्हणाले.
“एकेकाळी मुंबईला देशाची राजधानी बोललं जायचं. पण आता मी अस्वस्थ होतो. कारण मुंबई गिरणी कामगारांची होती. आज इमारती आल्या आणि मुंबईकर गायब झाला. मुंबईत आता सर्व्हिस सेक्टर आले आहेत. त्यात आपण ताबा मिळवला पाहिजे,” असेही शरद पवार म्हणाले.
0 Comments