अंडर १९ वर्ल्डकप: टीम इंडियाची घोषणा, प्रियम गर्ग कर्णधार, संघात ३ मुंबईकर



मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीनं उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. तर या संघात यशस्वी जयस्वाल आणि अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या तीन मुंबईकर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघासमोर विश्वविजेतेपद कायम राखण्याचं आव्हान आहे.
दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीनं आज संघाची घोषणा केली. १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चार गटांत ही स्पर्धा होईल. भारतीय संघाचं नेतृत्व प्रियम गर्गकडे सोपवण्यात आलं आहे. या संघात मुंबईच्या यशस्वी जयस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना यांना संधी दिली आहे. भारतीय संघ अ गटात खेळणार आहे. त्यात पहिल्यांदा पात्र ठरलेल्या जपानसह न्यूझीलंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरतील.



भारतीय संघानं चार वेळा अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. २०१८मध्ये अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला होता.

Post a Comment

0 Comments