मोबाइल ग्राहकांना दणका; 'हे' दर वाढणार

 
नवी दिल्ली : वाढता तोटा व कंपन्यांतर्गत निर्माण झालेली तीव्र स्पर्धा यातून उत्पन्नास फटका बसत असल्याने देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी ही तूट ग्राहकांकडून 'वसूल' करण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल, रिलायन्स जिओने डिसेंबरपासून दरवाढ करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानुसार या कंपन्यांनी रविवारी आपली सुधारित दरपत्रके जाहीर केली. यामुळे कॉलिंग व डेटावापर ४० ते ५० टक्क्यांनी महागले आहे. व्होडाफोन व 'एअरटेल'चे नवे दर आज, सोमवारी मध्यरात्रीपासूनच लागू होणार असून, 'जिओ'चे वाढीव दर सहा डिसेंबरपासून अंमलात येतील.

सुधारित दरपत्रकानुसार व्होडाफोन आयडियाच्या वर्षभर वैध असणाऱ्या प्लॅनसाठी आता ५० टक्के दरवाढीसह १,४९९ रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत हा प्लॅन ९९९ रुपयांना उपलब्ध होता. याच श्रेणीतील १,६९९ रुपयांचा अन्य प्लॅन आता २,३९९ रुपयांना मिळेल. याशिवाय व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कच्या फोनला कॉल केल्यास प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जातील. व्होडाफोन आयडियाने गेली चार वर्षे दर स्थिर ठेवले होते. मात्र, जिओच्या आगमनानंतर बाजारहिस्सा कमी झाल्याने तसेच, विविध थकीत शुल्कांपोटी केंद्र सरकारला सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याने या कंपनीची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे.

एअरटेल, 'जिओ'चीही घोषणा

व्होडाफोनसह भारती एअरटेल व रिलायन्स जिओनेही रविवारी दरवाढीची घोषणा केली. सुधारित दरपत्रकानुसार एअरटेलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. एअरटेलकडूनही अन्य नेटवर्कच्या कॉलसाठी प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जाणार आहेत. एअरटेलचा वर्षभर वैध असलेला सध्याचा १,६९९ रुपयांचा अमर्यादित प्लॅन आता २,३९८ रुपयांना उपलब्ध होईल. तर, सध्या ४५८ रुपयांत मिळणाऱ्या ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना ५९८ रुपये मोजावे लागतील. 'अमर्यादित श्रेणीतील प्लॅन निवडणाऱ्या आमच्या ग्राहकांना सध्याच्या प्लॅनच्या तुलनेत (वेगवेगगळ्या प्लॅननुसार) दररोज ५० पैसे ते २.८५ रुपये अधिक द्यावे लागतील. त्याचवेळी त्यांना अधिकचा डेटाही मिळेल,' असे 'एअरटेल'च्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे नवे दर सहा डिसेंबरपासून लागू होणार असून ही दरवाढ ४० टक्क्यांपर्यंत असेल. 

Post a Comment

0 Comments