एंटरटेन्मेंट डेस्क : मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींनी देखील विनोदी भूमिका लीलया साकारल्या आहेत. विनोद करणं हे अभिनेत्रीचे काम नाही किंवा त्यांना ते तितकं जमणार नाही असा समज चुकीचा ठरवत झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधील पुरुष मंडळींच्या टीममध्ये असलेली एकमेव अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील लोकांची मनं जिंकली आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी करताना तिने प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्र दौरा, देश दौरा आणि विश्व दौरा अशा ‘चला हवा येऊ द्या’च्या यशस्वी प्रवासानंतर श्रेयाला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली.
रसिकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल बोलताना श्रेया म्हणाली, “साधारण वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावात आमचा कार्यक्रम होता, तिथे पोहोचल्यानंतर कळलं की आजूबाजूच्या गावातूनही गर्दी करत ६० हजार लोक कार्यक्रम बघायला आलेत. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर बैलगाडी, सायकलवर लोक हातात कंदील घेऊन घरी जात असताना पाहिल्यावर आमच्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटले. एका कॅन्सरग्रस्त पुण्यातील काकूंना आमच्या कार्यक्रमामुळे आयुष्याचे चार दिवस वाढल्यासारखे वाटले, कोणा एका मुलीची आई कोमातून बाहेर आली म्हणून तिने माझं हॉटेलच बिल देऊ केलं. अनेक डॉक्टर आमच्या कार्यक्रमाचे एपिसोड्स थेरपी म्हणून वापरतात हे कळल्यावर मला आश्चर्यच वाटते.
0 Comments