आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजपा रिकामं होईल – नवाब मलिक


मुंबई : भाजपाचे काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक असून आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजपा रिकामं होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला आहे. विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलता त्यांनी हा दावा केला. “भाजपा आपल्याकडे ११९ आमदार असल्याचा दावा करत आहे. पण आज तशी परिस्थिती नाही,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
“भाजपानं आव्हान स्वीकारलं पाहिजे. आधी आपले ११९ आमदार दाखवा मग धमक्या द्या. भाजपामध्ये असे अनेक आमदार आहेत. ज्यांना अमिष दाखवून नेलं. आता सत्ता नाही म्हणून ते चलबिचल झाले आहेत. आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही, पण जर केलं तर अख्ख भाजपा रिकामं होईल हे त्यांना कळलं पाहिजे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. तसंच याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपा शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल असा टोला लगावला आहे.
“अधिक नावं घेण्याची प्रथा भाजपानंच सुरू केली. हे बेकायदेशीर असलं असं म्हटलं तर लोकसभा बर्खास्त होईल. त्यांनी आधी स्वत:कडे पाहाव नंतर दुसर्याकडे बोट दाखवावं,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments