नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य : भाजप



मुंबई - महाआघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने त्यावर आक्षेप घेतला आहे. 'या शपथविधीवेळी आमदारांना त्यांच्या नेत्यांची नावे घेतली, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे. त्यामुळे हा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे,' अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
महाराष्ट्रात गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर अखेर महाविकास आघाडीचा शपथविधी समारंभ शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी शपथ ग्रहण केले. मात्र मंत्रिपदाची शपथ घेताना कुणी छत्रपती शिवरायांचे तर कुणी त्यांच्या पक्ष प्रमुखांचे नाव घेतले. अशा पद्धतीने नावे घेऊन शपथ घेणे नियमबाह्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 'महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्याआल्याच सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे,' अशी टिप्पणीही पाटील यांनी केली. खरे पाहता याविरोधात न्यायालयाकडे दाद मागायला हवी, मात्र आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हा शपथविधी रद्द करण्याची मागणी केली आहे,' असे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments