माणसाच्या आयुष्याची गोष्ट सांगणारी "अंत्यकथा"
65 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहिल्यानगरचे आठवे नाटक नाट्यआराधना या संस्थेने "अंत्यकथा" सादर केले.
अहिल्यानगर : गावच्या विठ्ठल मंदिरात ग्रामस्थ जमून भजन करीत असतात. तात्या भजन म्हणत असतो. भजन संपत असते तर सावकार येतो, तसे तात्या मंदिराचा हिशोब तयार असल्याचे सांगतो. तेव्हा सावकार हिशोबात लई घोळ घालून ठेवला आहे . आणि गेल्या वर्षी तुम्ही मंडळीच्या आजारपणासाठी 50 हजार रुपये घेतले होते तेही उद्याच्या उद्या जमा करा, नाहीतर तुमची जमीन माझ्या नावावर करून घेईन असे म्हणून सर्वजण आपापल्या घरी जातात. तशी चंद्रा ओसरीवर बसून सोन्यामामा बरोबर जेवत असते . सोन्यामामा तिला सापाच्या पिल्लाची गोष्ट सांगत असतो. तात्याला आलेले पाहता सोन्यामामा तात्याशी बोलू लागतो. बोलता बोलता हिशोबाचा विषय निघतो, तेव्हा सोन्यामामा तात्याची समजूत काढून चला आता दोन घास खाऊन घ्या म्हणतो . दुसऱ्या दिवशी तात्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी येते छोटी चंद्रा हे सगळे पाहत असते.
चंद्रा मोठी झाल्यावर सोन्यामामा तिचे शरदशी लग्न लावून देतो. पुढे जमिनीच्या वादातून शरदची हत्या होते. हल्लेखोर कागदावर सही घेण्यासाठी चंद्राच्या मागे लागलेले असतात. मात्र चंद्रा सही द्यायला नकार देऊन गाव सोडून जाते . गरोदर चंद्रा एका स्मशानात येऊन बसते. तिथे प्रेत जाळण्यासाठी आलेलया शंकर आबाशी चंद्राची गाठ पडते. बोलचालीतून दोघांची ओळख निघते. तसं आबा, तिला मलाही एका मदतनीसाची गरज आहे . आणि तुलाही कामाची ,माझ्याबरोबर काम करशील तर तुझ्या राहण्याचाही प्रश्न सुटेल असं म्हणून तो तिला सरकारी दवाखान्याच्या शवागारात घेऊन येतो. मात्र चंद्रा इथेच सोडून दुर्गाअक्का म्हणून माझ्याबरोबर चल असे म्हणून शंकर तिला सरकारी दवाखान्यात घेऊन येतो. दुर्गाआक्का शंकर आबाची मदतनीस म्हणून काम करू लागते. हळूहळू ती पोस्टमार्टमही करायला शिकते.
दरम्यान त्याचं रुग्णालयातील एक कर्मचारी विलास हा शवागारात येतो. त्यावेळी गावातील नेता अण्णा चे पोस्टमार्टम शंकर आबा करत असतो. विलास त्याला 25 हजार रुपये देण्याचं आमिष देऊन अण्णाचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास सांगतो. तेव्हा शंकर आबा या गोष्टीला साफ नकार देतो . त्यातून विलास आणि शंकर आबाची बाचाबाची होते. झालाप्रकार दुर्गा अक्का पाहत असते. विलास शंकरआबाला इथून पुढे तू काम कसे करतोस तेच मी पाहून घेतो असे म्हणून निघून जातो . शंकर आबा जिवंतपणे माणसं आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतात . मात्र प्रेत सगळी खरं सांगतात असे सांगून माणूसला लटकला की लटकवला, जळाला की जाळला, माणसाचा घातपात झाला का, त्याला बुडवला की बुडाला हे सगळं प्रेत सांगतं आणि त्या ओळखण्याच्या खाणाखुणा तो दुर्गा अक्काला शिकवतो, आणि म्हणतो माझ्या नंतर तू हे काम अत्यंत प्रामाणिकपणे कर पुढे शंकर आबाच्या या कामातून निवृत्त होतो. पोस्टमार्टम करण्याचे काम दुर्गाअक्का एकटी करू लागते . अनेक प्रेतांचे पोस्टमार्टम केल्यानंतर दुर्गा या कामात रुळलेली असते . प्रत्येक प्रेताचे पोस्टमार्टम केल्यानंतर ते प्रेत आपल्या वडिलांची घडलेली घटना आणि नवऱ्याबरोबर घडलेली घटना यातील साम्य शोधण्याचा प्रयत्न करत असते. असं ती प्रत्येक प्रेताशी पोस्टमार्टेम करताना संवाद साधते. एक दिवस विलास शवागारात येतो . तिला दारू पिण्यासाठी ग्लास मागतो . मी सांगेल तसं तसं वाग नाहीतर तुझी नोकरी घालवेन अशी धमकी देतो . आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो . तेव्हा दुर्गाअक्का त्याला तिच्यातील दुर्गा अवतार दाखवते. आणि त्याला तिथून घालवते.
एक दिवस शवागारातील फोन खणाणतो आणि नवीन प्रेत येत असल्याची माहिती मिळते .नवीन शव शवागारात आणून ठेवल्यावर दुर्गाअक्का त्या प्रेतावरील चादर काढून पाहते, तिला धक्का बसतो तिथेच पोस्टमार्टम टेबलच्या जवळच दुर्गाअक्का खाली बसते. तिला अस्वस्थ वाटायला लागते . तिने आजवर केलेल्या प्रेतांच्या पोस्टमार्टम ची आठवण होऊ लागते. इथेच पडदा पडतो.
माणूस स्वार्थासाठी किती खालच्या थराला जातो तो एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करतो. किंवा एखाद्याची हत्याही करतो मात्र प्रेताच्या पोस्टमार्टमच्या वेळी ते प्रेत त्याच्याबरोबर काय घडलं ते सत्य सांगत असतं. त्यादरम्यान त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची कशी फरफट होते. हे सांगणार कथानक म्हणजे "अंत्यकथा "हे नाटक. संहितेचे लेखन प्रा. प्रमोद खाडिलकर यांनी केले असून या नाटकाचे दिग्दर्शन तेजस अतितकर यांनी केले आहे . नाटकाची नायिका लहानपणी चंद्रा तरुणपणी मोठी झालेली चंद्रा आणि नवऱ्याच्या हत्ये नंतर झालेली दुर्गाअक्का नंतर तिला झालेली मुलगी. पुढे या मुलीलाही मुलगी होते. असे तीन पिढ्यांचा नाट्यप्रवास या नाटकात दाखवला गेला . त्यामुळे नाटकात सुरुवातीपासूनच वेगवान घडणाऱ्या घटनांमुळे पहिल्या अंकात चांगली गती पकडली होती, तर दुसऱ्या अंकात घडणाऱ्या घटनांमुळे ही गती काहीशी मंदावली . दिग्दर्शनाबरोबरच तेजस अतीतकर यांनी तात्या हे पात्र साकारताना त्यालाही न्याय दिला.
दुर्गाअक्काच्या भूमिकेत तेजा पाठक या रंगमंचावर जबाबदारीने वावरल्या, पोस्टमार्टम करणारी स्त्री त्यांनी अत्यंत समरसून साकारली. शंकरआबा ची भूमिका सचिन शिंगटे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पेलली मात्र काही वेळी हळू आवाजातील त्यांचे संवाद प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नव्हते . सावकाराच्या भूमिकेत सुजित भावे, सोन्यामामाच्या भूमिकेत अजिंक्य सोनवणे, नारायण कुलकर्णीच्या भूमिकेत देवदत्त चौसाळकर,छोट्या चंद्राची भूमिका भार्गवी सुलक्षणे,मोठी चंद्राची भूमिका आर्या सातपुते, सखू आणि नर्सच्या भूमिकेत गौरी देशपांडे आणि डॉक्टर च्या भूमिकेत मोनिका दार्वेकर चांगल्या वावरल्या. चेतनच्या भूमिकेतील ऋषिकेश त्रंबके आदींनी त्यांच्या भूमिका कथानकाला साजेशा निभावल्या .
नेपथ्यात चैतन्य खानविलकर, सुजित भावे यांनी स्मशान शवागार अत्यंत बारकाव्यांनिशी उभारले. सोहम दायमा यांची प्रकाशयोजना प्रसंगांना उठाव देणारी होती काही प्रसंगात मात्र प्रकाश योजनेची थोडी गडबड झाली, उदाहरणार्थ प्रेताचे डोके मांडीवर घेऊन दुर्गाअक्का अंगाई म्हणते तेव्हा अर्धी अंगाई संपूर्ण अंधारात म्हटली गेली. नाटकाचे पार्श्वसंगीत समीर पाठक व तनिष्क भंडारी यांनी दिले ते नाटकाच्या कथानकाला साजेसे होते. मात्र त्याचा आवाज इतका मोठा होता की कित्येकदा पात्रांचे संवाद त्यात विरून जात होते. चंद्रकांत सैंदाणे यांनी रंगभूषेची बाजू तर दिपाली अडगटला यांनी वेशभूषेची बाजू चांगली सांभाळली विराज अडगटला ,राहुल रसाळ ,महादेव गाडे ,मैथिली जोशी, तन्मय भावे यांनी रंगमंच व्यवस्था चोख ठेवली होती . या नाटकाला दिनकर घोडके, अहमदनगर जिल्हा वाचनालय, सेव्हन डायमेन्शनल स्टुडिओ व सुधीर देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कथानकात सखुचा जन्म कधी होतो ती कोठे मोठी होते. तिचे लग्न कधी होते. या प्रश्नांचा उलगडा होत नाही . नाट्यसंहितेच्या कथानकाचा 'स्पॅन' मोठा असल्याने काही मुद्द्यांचा उलगडा न होता ते अनुत्तरीच राहतात, मात्र एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा नाटकाच्या मूळ कथानकावर परिणाम न होता स्पर्धेला साजेसा असा "अंत्यकथा "चा प्रयोग सादर झाला.
- देवीप्रसाद अय्यंगार

.jpg)


.jpg)

.jpg)

0 Comments