तृतीयपंथीयांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारं "जेंडर अँड आयडेंटिटी"
65व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे पाचवे नाटक अहिल्यानगर मधील कल्पद्रुम फाउंडेशन ने सादर केले.
अहिल्यानगर: अनिरुद्ध आणि रजनी चा मुलगा सिद्धांत वयात येतानाच्या वळणावर त्याच्या शरीरात जनुकीय बदल होत असल्याने मुलींसारखा वागू लागतो. त्यावरून त्याचे आणि रजनीचे खटके उडत असतात.सिद्धांतच्या अशा वागण्याने नातेवाईकांमध्ये होणारी कुजबूज रजनीला अस्वस्त करत असते. त्यामुळे तिचे अनिरुद्धशीही वाद होत असतात.पेशाने लेखक असलेला अनिरुद्ध सिद्धांतला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर रजनी सिद्धांतच्या लहानपणापासून स्वतःच्या हौशीखातर त्याला फ्रॉक घाला,वेण्या घाला, असे सर्व केल्याने सिद्धांतची मानसिकता ही तशीच होऊ लागली आहे असे म्हणून या प्रकाराचे खापर अनिरुद्धच्या डोक्यावर फोडत असते. रजनी फावल्या वेळात लेडीज बुटीक चा व्यवसाय करत असल्याने तिच्या आर्थिक गरजा त्यातून भागवत असते.एक दिवस सिद्धांत तिच्याच बुटीक मधील कपडे घालून पाहात असतांना तिथे रजनी येते. त्याने केलेल्या मुलीचा पेरावा पाहून ती भडकते तू आता लहान आहेस का?, अरे तू आता वयात आला आहेस. कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचं हे वय आहे. तसेच सिद्धांत ही तिला सांगतो की तो प्रेमात पडला आहे. तसं रजनी त्याला कौतुकाने उत्सुकतेने विचारते कोण आहे रे ती मुलगी? तेव्हा सिद्धांत तिला सांगतो मुलगी नाही,तर तो एक मुलगा आहे.रजनी पुन्हा एकदा त्याच्यावर भडकते आणि हे होणं शक्य नाही. असे म्हणून ती सिद्धांतच्या कानाखाली लावते. झाल्या प्रकरणावरून सिद्धांत घर सोडून निघून जातो.
सिद्धांतची खूप शोधा शोध होते.रजनी पोलीस स्टेशनला नेहमी खेटा घालत असते,तर अनिरुद्ध त्याच्या पद्धतीने सिद्धांताचा शोध घेत असतो. सिद्धांत कोणातरी हिजड्याच्या टोळीत सामील झाल्याची माहिती मिळते. मग अनिरुद्ध घरादाराकडे दुर्लक्ष करून हिजड्याच्या पेहरावात सिद्धांतचा शोध घेऊ लागतो. एकदा रेल्वे स्टेशनवर फिरत असताना त्याला काही हिजडे भेटतात. ते हिजडे अनिरुद्धाची चौकशी करतात. तेव्हा तो कोपरगाव होऊन आलो आहे असे सांगतो आणि मला तुमच्यात राहू द्या अशी विनवणी करतो. डॉली नावाचा हिजडा अनिरुद्धाला बरोबर राहू देण्यास हरकत नाही असे म्हणते. तर सिमरन नावाचा हिजडा सुरुवातीला त्याला विरोध करते तेव्हा डॉली सिमरन ला जशी आपल्याकडे आता खुशी आली आहे ना तशीच ही पण राहील असे सांगते आणि तिला गुरु माँ नानीशी भेट घेण्याचा सल्ला देते.
नानी कडे खुशीचा रीत करण्याचा कार्यक्रम असतो त्यात सिद्धांतची रीत होऊन तिचं नाव खुशी होते.खुशीची रीत झाल्यानंतर काही दिवसातच अनिरुद्धाची डॉली आणि सिमरन मुळे खुशीशी गाठ पडते. प्रथमदर्शनीस खुशी आणि अनिरुद्ध एकमेकांना ओळखतात थोडा एकांत मिळताच अनिरुद्ध खुशीला तिथून बाहेर पडण्याचा सल्ला देतो. त्यावर खुशी त्याला म्हणते नाही बाबा आता काही दिवसातच मी ऑपरेशन करून घेऊन माझ्या मित्राबरोबर संसार थाटणार आहे. तू येशील ना बाबा माझा संसार बघायला? मी आता सुद्धा तुला स्वीकारायला तयार आहे.
पण तू आधी इथून बाहेर पड. तेव्हा खुशी त्याला बाबा या लोकांच्या खूप समस्या आहेत त्यावर तुला खूप लिहिता येईल आणि मला या सर्वांना या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यासाठी मी लढेल असे सांगते. तेव्हा अनिरुद्ध तिला तू त्यांच्यासाठी खूप लढशील पण या बदलायला तयार होतील का? असं विचारतो तेव्हा खुशी मी प्रयत्न करेन असे म्हणते. पण तू आईची काळजी घे असेही अनिरुद्धला बजावते.
काही दिवसांनी अनिरुद्ध पुन्हा खुशीला भेटायला येतो आणि रेल्वे स्टेशनच्या फलाटावर त्यांची भेट होते. ते दोघे एकमेकांना भेटणार म्हटल्यावर डॉली आणि सिमरन आधी त्याला विरोध करतात पण खुशी डॉलीला पटवते. तसं डोली सिमरनला म्हणते दोघांना थोडा वेळ बोलू दे मग खुशीला घेऊन नानीकडे ये असे म्हणून डॉली निघून जाते. खुशी आणि अनिरुद्ध बोलू लागतात तेव्हा खुशी अनिरुद्ध ला सांगते बाबा तू असा वरचेवर भेटायला येत जाऊ नको. एवढ्यात सिमरन तिला खुशी बास झाले चल आता जाऊयात असे म्हणते.
एके दिवशी ख़ुशी डॉली आणि सिमरन रेल्वे स्टेशनवर फिरत असताना सिमरन नेहमीप्रमाणे गिऱ्हाईक पटवण्याचा नादात असते इतक्यात एक जण येऊन डॉलीला चल म्हणतो तर ती आज नको असं म्हणते तेव्हा तो अर्वाच्च भाषेत तिच्याही बोलू लागतो. तेव्हा खुशीमध्ये पडते तेव्हा तो माणूस खुशी कडे पाहून अरे वा नवीन माल वाटतं? चला मग आज तुझ्याबरोबर मजा करतो. असे म्हणत तो खुशीचा हात धरण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला विरोध करते. डॉलीही तिला साथ देते मात्र शेवटी तो माणूस खुशीला जबरदस्ती उचलून घेऊन जातो.
दुसऱ्या दिवशी रेल्वे खाली कोणीतरी आत्महत्या केल्याची बातमी पसरते. चॅनल वाले, पोलीस वगैरे सर्वांची तिथे गर्दी जमा होऊ लागते. चौकशीअंती खुशीनेच आत्महत्या केल्याचे समजते. तिचे प्रेत पोस्टमार्टम साठी दवाखान्यात नेतात. तेव्हा नानी,डॉली,सिमरन व इतरही तिथे पोहोचतात आणि खुशीचा अंत्यविधी हिजडांच्या रीती रिवाजाप्रमाणेच होईल असे सांगतात. तितक्यात अनिरुद्ध दवाखान्यात पोहोचतो आणि तो खुशीचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी आल्याचे सांगतो. त्याचे बोलणे ऐकून नानीलाही पाझर फुटतो आणि ती अनिरुद्धला म्हणते तूच खुशीचे प्रेत ताब्यात घेणार असशील तर शंभर वेळा मी तुझ्या पोटी हिजडा म्हणून जन्माला येणे पसंत करीन.
माणसाचे लिंग फक्त त्याची ओळख असते खरंतर स्त्री-पुरुषांनी हे समजावून घेऊन तृतीयपंथीयांनाही समाजात सामावून घेऊन सन्मानाची वागणूक द्यायला हवी असे संदेश देणारे डॉक्टर सोमनाथ सोनवलकर यांचे "जेंडर अँड आयडेंटिटी' हे नाटक गणेश लिमकर यांनी दिग्दर्शित केले. त्यांनी कथानकाला चांगलाच न्याय दिला त्याचबरोबर अनिरुद्धीची भूमिका ही गणेश लिमकर यांनी अत्यंत नेटक्या पद्धतीने साकारली.रजनीच्या भूमिकेत संध्या पावसे यांनी त्यांच्या मनाची होणारी घालमेल, घुसमट उत्तम साकारली. सिद्धांतच्या व खुशीच्या भूमिकेत वेगळेपण दाखवत मोहित मेहेर उत्तम वावरले, डॉलीच्या भूमिकेत विद्या जोशींनी नेटका अभिनय केला, तर सिमरनच्या भूमिकेतील कृष्णा वामने मात्र अभिनयाच्या जोरावर भाव खाऊन गेला.नानीच्या भूमिकेत अविनाश कराळे प्रभावीपणे वावरले. हवालदाराच्या भूमिकेत सुनील लांबाडे व सागर खिस्ती योग्य वाटले, तर नंदिनी स्वामी, साई चासकर, निलेश मेढे, अनिकेत जोशी आणि कालिंदी केसकर यांनी भूमिकेला साजेसा अभिनय केला. नाटकाच्या नेपथ्याची बाजू सांभाळताना अंजना मोरे, समीर कुलकर्णी यांनी दाखविलेले अनिरुद्ध चे घर, रजनीचे बुटीक आणि रेल्वे स्टेशन आदी गोष्टी दाखवण्यात ते यशस्वी ठरले. शैलेंश देशमुख यांचे संगीत नाटकाला साजेसे होते. नाटकाच्या प्रकाश योजनेची बाजू विनोद गरुड यांनी सांभाळली. नाटकाची रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी पुरुष पात्रांना स्त्रियांसारखी रंगभूषा करून दाद मिळवली, तर दीपक लोळगे यांची वेशभूषा नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. रंगमंच व्यवस्था आदित्य घोडेस्वार यांनी चोख ठेवली होती. तर नाटकाचे आकर्षक पोस्टर करून त्याची प्रसिद्धी अविनाश कराळे यांनी उत्तम केली. एकूणच तृतीयपंथीयांना समाजाने दिलेले स्थान आणि बदलती परिस्थिती यावर विचार करायला या नाटकाने भाग पाडले एवढे नक्की.
या नाटकात एक दोन वेळा अगदीच किरकोळ चुका झाल्या त्यात संवाद फेकीतून एक दोन पात्रांकडून गडबड झाली आणि मुख्य म्हणजे जेव्हा सिद्धांत घरातून बाहेर पडतो तेव्हा दारातच अनिरुद्धची आणि सिद्धांतची भेट होते तेव्हा ते एकमेकांना ओळख न दाखवता निघून जातात. वास्तविक पाहता घराचा दरवाजा उघडा असतानाच अनिरुद्ध बेल वाजवतो आणि रजनी येऊन दार उघडते हे पहाताना खटकते. या चुका वगळता प्रयोग अत्यंत नेटक्या पद्धतीने सादर झाला.









0 Comments