जीकेएन कंपनीच्या वतीने वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 चीनच्या लि-सन यांची आदर्श गाव मांजरसुंबा येथे भेट ,,,

जीकेएन कंपनीच्या वतीने वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 


- लि-सन : मांजरसुंबाचे पर्यावरणीय कार्य चीनशी स्पर्धा करणारे, विकासकामांचे कौतुक

अहिल्यानगर  : नगर एमआयडीसीतील जीकेएन  सिंटर मेटल्स (GKN) कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी चीनमधून जीकेएन कंपनीचे आशिया व्हाईस प्रेसिडेंट लि-सन यांनी विशेष उपस्थिती लावली. गावातील विकासकामे, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, शिक्षण आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागाची पाहणी करून त्यांनी मांजरसुंबा गावाचे कौतुक केले.

यावेळी बोलताना लि-सन म्हणाले की, मांजरसुंबा गावात पर्यावरण संरक्षणासाठी होत असलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. या गावातील पर्यावरण संवर्धनाची बरोबरी चीनमधील अनेक प्रगत भागांशी करता येईल. येथे जाणवणारी सकारात्मक ऊर्जा चीनमधील काही विकसित गावांची आठवण करून देते. भारतात आल्यानंतर नेहमीच आनंद वाटतो. हिमालय पर्वतरांगांमुळे भारत आणि चीन यांच्यातील भौगोलिक अंतर मोठे असले तरी दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये अधिक सांस्कृतिक आणि सामाजिक संवाद वाढला पाहिजे. हा संपर्क केवळ राजकीय पातळीवर न राहता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गावातील महिलांचा सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग विशेष कौतुकास्पद असून जीकेएन कंपनी केवळ उद्योग व्यवसायापुरती मर्यादित नसून समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्येही सातत्याने कार्यरत आहे. मांजरसुंबा गावाला भेट देऊन मनस्वी आनंद झाला असून पुन्हा या गावाला भेट देण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जीकेएन कंपनीचे आशिया व्हाईस प्रेसिडेंट लि-सन, डायरेक्टर - इंडिया ऑपरेशन्स राजेश मीराणी, सरपंच रूपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, डायरेक्टर - फायनान्स इंडिया सचिन असोले, डायरेक्टर - सेल्स सिद्धार्थ मित्रा, जनरल मॅनेजर सुधीर पोळ, प्लांट डायरेक्टर पुरुषोत्तम रिशी, डॉ. अभिजीत कुलकर्णी, सुनील राठी, बबन हिंगे, सिद्धार्थ भोसले, विठ्ठल हंडोरे, रमेश म्हस्के, मनोज गोरे, मिलिंद जपे, सोमनाथ ठोंबरे, ग्रामसेविका सारिका वाळुंज, विलास भुतकर, इंद्रभान कदम, चंद्रभान कदम, बाळासाहेब कदम, अक्षय कदम, गर्भगिरी शेतकरी महिला गट, शिव महिला गट तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश मीराणी म्हणाले की, जीकेएन कंपनीचे आशिया व्हाईस प्रेसिडेंट लि-सन यांनी मांजरसुंबा गावाला भेट देऊन येथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शिक्षण, शेती, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात गावाने केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. जीकेन कंपनी रोजगार निर्मितीबरोबरच समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या गावात झाली असून श्री गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या विकासासाठी कंपनीचे सहकार्य भविष्यातही कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

उपसरपंच जालिंदर कदम यांनी सांगितले की, जीकेएन कंपनी आणि मांजरसुंबा गाव यांचे कौटुंबिक व स्नेहाचे नाते निर्माण झाले आहे. कंपनीच्या सहकार्याने विविध विकासात्मक आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या लोकसहभागामुळे शासनाच्या अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली असून विविध पुरस्कारांच्या माध्यमातून गावाला सुमारे ६० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळे पावसाचे पाणी अडविण्यात यश आले असून शेतकरी वर्षभर विविध पिके घेत असल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यावरण व सुरक्षा अधिकारी बबन हिंगे यांनी सांगितले की, जीकेएन कंपनीच्या वतीने मांजरसुंबा गावात २७०  विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून त्यासाठी सिंचन व्यवस्था आणि संरक्षणासाठी सुरक्षा कुंपणही उभारण्यात आले आहे. वड, पिंपळ, कदंब, बकुळ, नीलमोहर, गुलमोहर, अर्जुन, तबेबिया, बूच, रबर यांसारख्या विविध प्रजातींची वृक्षलागवड करण्यात आली असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच रूपाली कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments