तेजस्विनी बोबडे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

  तेजस्विनी बोबडे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण; पीएसआय पदावर निवड


श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, कल्याण रोडच्या वतीने गौरव; शेतकरी कुटुंबातील कन्येच्या यशाचा सन्मान

अहिल्यानगर  : जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर शेतकरी कुटुंबातील कन्या तेजस्विनी कल्याण बोबडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड मिळवली आहे. सध्या त्या गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असून नोकरी सांभाळत त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, कल्याण रोड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास सामाजिक कार्यकर्ते ॲड. युवराज शिंदे, शेषराव आडोळे, बाबासाहेब आंधळे, सोपानराव रोकडे, शंकर बोरुडे, गणेश बेरड, निकिता बेरड, राजू पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. युवराज शिंदे म्हणाले की, आजच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. शिक्षण, प्रशासन, पोलीस सेवा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मुली उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. शेतकरी कुटुंबातील तेजस्विनी बोबडे यांनी नोकरीची जबाबदारी सांभाळत अभ्यासात सातत्य ठेवले आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली. त्यांचे हे यश अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस श्री महालक्ष्मी मित्र मंडळाच्या वतीने शुभेच्छा देत त्या समाजाभिमुख आणि जनतेच्या हिताचे कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना तेजस्विनी बोबडे म्हणाल्या की, पोलीस खात्यातील नोकरी सांभाळत नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे एमपीएससी परीक्षेत यश मिळाले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत समाजासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबीयांचे प्रोत्साहन आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी तेजस्विनी बोबडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments