रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी ॲड.डॉ.बाळ बोठे याची जामीनावर सुटका
नगर: बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी ॲड.डॉ. बाळ ज. बोठे यांची सुमारे पाच वर्षांच्या कारावासानंतर जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बिनशर्त जामीन मंजूर केल्याने शनिवारी (दि. १७) संध्याकाळी त्यांची मुक्तता करण्यात आली.या प्रकरणात जामीनासाठी बोठे यांनी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता.
त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला निर्दिष्ट मुदतीत साक्षी नोंदविण्याचे आणि निकाल देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने अखेर बाळ बोठे यांना जामीन मंजूर केला.या खटल्यात बोठे यांची बाजू वरिष्ठ वकील ॲड.सुधांशु चौधरी, ॲड. कैलास औताडे, ॲड. नितीन भवर, ॲड. शिवकुमार जंगवाड यांनी मांडली. आदेश प्राप्त झाल्यानंतर बोठे यांचे वकील ॲड. महेश तवले यांनी जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली.
त्यानंतर संध्याकाळी बोठे यांची औपचारिक सुटका करण्यात आली.सध्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असून एकूण ९८ साक्षीदारांपैकी बहुतांश साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. सध्या मयत रेखा जरे यांचा मुलगा कुणाल जरे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष सुरू आहे. आरोपींच्या बचावासाठी ॲड. परिमल फळे, ॲड. महेश तवले, ॲड. सुनिल मगरे व ॲड. जयंत जोशी हे वकील काम पाहत आहेत. या सुटकेमुळे प्रकरणाला नव्या घडामोडींचा वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरात या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, पत्रकार आणि कायदेविषयक वर्तुळातही या निकालाला विशेष महत्त्व दिले जात आहे.



0 Comments