अहिल्यानगर स्वच्छतेच्या दिशेने पुढे

 अहिल्यानगर स्वच्छतेच्या दिशेने पुढे 
 आमदार संग्राम जगताप यांचा स्वच्छता मोहिमेला पुढाकार

 अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शहर स्वच्छ व आकर्षक ठेवणे हे आपले सामूहिक कर्तव्य - आ.जगताप 

अहिल्यानगर :  शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच ही मोहीम राबवली जात असून, स्वतः आमदार जगताप सकाळी ६ वाजल्यापासून रस्त्यावर उतरून स्वच्छतेच्या कामांचे निरीक्षण करत आहेत. स्वच्छता मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरील माती, बांधकाम साहित्य, झाडांच्या फांद्या तसेच फुटपाथवरील कचरा आणि माती हटवून रस्ते झाडण्यात आले. या दरम्यान वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि पार्किंगमध्ये अयोग्य ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठीही पोलिस आणि प्रशासनाने समन्वयाने कारवाई केली.

             प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने सूचना देत पॅचिंगचे काम सुरू करण्यास सांगितले. सध्या या भागात खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असले तरी, त्यावर मातीचे ढिगारे व कचरा असल्यामुळे परिसरात अस्वच्छता जाणवत होती. त्यामुळे स्वच्छता मोहिमेद्वारे या ठिकाणीही साफसफाई करण्यात आली. 

आमदार जगताप म्हणाले की, अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शहर स्वच्छ आणि आकर्षक ठेवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या सहकार्याने ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागरूकता वाढत असून, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वस्तरांतून सहकार्य मिळत आहे.

Post a Comment

0 Comments