अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार

अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार 


मान्यवरांकडून दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली

अहिल्यानगर : राहुरी मतदार संघाचे आमदार व ज्येष्ठ नेते स्व. शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी नगरला सहकार सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेत जिल्ह्यातील नेत्यांसह भाजपच्या सर्व आमदारांनी शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच यावेळी दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कर्डिलेंच्या स्मृती विशद करताना अनेकांना गहिवरून आले. 

       नगरच्या सहकार सभागृहात दिवंगत नेते कर्डिले यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी विधानसभेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, आ. आशुतोष काळे,  आमदार विक्रम पाचपुते, आमदार विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, बबनराव पाचपुते, आगरकर, वाल्मीक कुलकर्णी, गणेश भोसले, विक्रम तांबे, अविनाश घुले, सुरसिंग पवार,  दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, प्रशांत गायकवाड, संदीप कोतकर, संभाजी पालवे, सत्यजित कदम, उदयन गडाख, राजेंद्र फाळके, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

           यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी दिवंगत नेते कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या जाण्याने राहुरी मतदारसंघ पोरका झाला. यामुळे आता अक्षय कर्डिले यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी या मतदार संघातून उमेदवारी करावी तसेच जिल्ह्यातील कर्डिले यांच्या सर्व समर्थकांनी व भाजपच्या नेत्यांनी अक्षय कर्डिले यांना साथ देत शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन अनेक मान्यवरांनी त्यांच्या श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. 

         यावेळी सत्यजित कदम यांनी कर्डिले हे कार्यकर्त्यांना जपणारे त्यांच्यात रमणारे नेतृत्व होते तर उदयन गडाख यांनी कर्डिले व गडाख कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या अचानक जाण्याने ही दिवाळी दुःख देणारी ठरल्याची भावना व्यक्त केली 

       पद्मश्री पोपटराव पवार व माधवराव कानवडे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देताना जिल्हा बँकेत कर्डिले हे शेतकरी घटक मानून काम करत असल्याचे सांगितले.  ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब मस्के यांनी कर्डिले यांनी विरोधाचा विचार न करता काम केले जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दरारा होता कर्डिले हे दिलदार व्यक्तिमत्व होते त्यांनी विरोधकांना कधीही मुद्दामून त्रास दिला नाही असे सांगितले.

       तर पाचपुते पिता पुत्रांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहत भविष्यात सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. 

           सभापती राम शिंदे यांनी दिवंगत नेते कर्डिले यांना श्रद्धांजली वाहत या सभागृहात एक महिन्यापूर्वी जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली होती त्यानंतर आता लोकसभेचे आयोजन करण्याची वेळ आली ही बाब मनाला खेद देणारी आहे. अहिल्यानगर जिल्हा हा संस्थानिक व प्रस्थापितांचा जिल्हा असून या ठिकाणी कर्डिले यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी राजकीय समीकरणे असताना ६ वेळा निवडून येण्याची किमया साधली. त्यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर ही बँक खऱ्या अर्थाने साखर कारखानदारांसोबत शेतकऱ्यांची व दूध उत्पादकांची असल्याचे त्यांच्या कामातून दाखवून दिले कर्डिले हे सातत्याने लोकांमध्ये राहणारे नेते होते कर्डिले यांच्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देऊ तसेच अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अक्षय कर्डिले यांनी देखील जबाबदारी स्वीकारून पुढे जाण्याची वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

         यावेळी आमदार दाते, आमदार खताळ, आमदार काळे, आमदार मोनिका राजळे, सदाशिव लोखंडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 








Post a Comment

0 Comments