इमारतीच्या रचनेचा परिणाम आपल्या शरीरावर - सुयश पारिख
नगर : आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, अहिल्यानगर आणि पोलाद स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने “कोड्सपासून कार्बनपर्यंत: भारत आणि ऑस्ट्रेलिया वेगळं का बांधतात?” या विषयावर सुयश परिख यांचे प्रेरणादायी व्याख्यान नुकतेच पार पडले. या कार्यक्रमास पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे आणि आदेश गूंगे, तसेच संस्थेचे प्रदीप तांदळे, भुषण पांडव, सुनिल औटी, संतोष खांडेकर, गौरव मांडगे, संकेत पादिर, सचिन डागा, अनमोल जैन आणि इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुयश परिख हे सध्या ऑस्ट्रेलियात सस्टेनेबल आणि ग्रीन बिल्डिंग डिझाईन क्षेत्रात कार्यरत असून, भारतातही त्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. पर्यावरणपूरक बांधकाम आणि मानवी आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, इमारती या आपल्या तिसऱ्या त्वचेप्रमाणे असतात. बाह्य हवामानाचा जसा थेट परिणाम इमारतीच्या रचनेवर होतो, तसाच इमारतीच्या रचनेचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतो.त्यांच्या डिझाईन तत्त्वज्ञाना बद्दल बोलताना सुयश म्हणाले, इमारती आपल्या आरोग्यावर आपल्या कल्पनेपेक्षा जास्त प्रभाव टाकतात. प्रकाश, हवा, तापमान आणि साहित्य यांची निवड आपल्याला आरोग्यदायी बनवू शकते — किंवा हानिकारक ठरू शकते. प्रत्येक आराखडा म्हणजे मानवी आरोग्य आणि आरामासाठी लिहिलेली एक वैद्यकीय चिठ्ठी आहे.
सध्या औद्योगिक प्रदूषण, वाहनांमुळे वाढणारे धूर आणि उर्जेचा अतिवापर या कारणांमुळे पर्यावरणीय असंतुलन वाढत आहे. या संदर्भात त्यांनी पुढे सांगितले की, जर इमारती जागतिक ऊर्जेच्या आणि कार्बन उत्सर्जनाच्या ४० टक्के भागासाठी जबाबदार असतील, तर आर्किटेक्ट, इंजिनीअर आणि विकासक (डेव्हलपर्स) हे त्या समस्येच्या ४० टक्के उपायाचा भाग आहेत. प्रत्येक डिझाईन निर्णय म्हणजे पृथ्वीच्या आरोग्याकडे टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे.
व्याख्यानात भारत आणि ऑस्ट्रेलियातील बांधकाम नियम (Codes), हवामानाला प्रतिसाद देणाऱ्या रचना (Climate Response), वापरले जाणारे साहित्य (Materials), आणि बांधकामाची मानसिकता (Mindset) या चार मुख्य घटकांवर त्यांनी तुलनात्मक विश्लेषण केले.
सुयश यांनी दोन्ही देशांतील ऊर्जा कार्यक्षमता, कार्बन उत्सर्जन नियंत्रण आणि टिकाऊ बांधकाम तंत्रज्ञानातील फरक स्पष्ट करत “कमी कार्बन असलेल्या भविष्याकडे वाटचाल” ही संकल्पना मांडली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभिजित देवी यांनी सांगितले की, आपल्या शहरात ग्रीन बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या पाहिजेत. यासाठी आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्सनी नागरिकांना याबाबत जागरूक करणे आणि साक्षर बनवणे गरजेचे आहे
कार्यक्रमादरम्यान वर्ल्ड आर्किटेक्ट डे आणि व्हॅल्यूअर डे साजरे करण्यात आले. या निमित्ताने सुयश परिख, धीरन सुराणा, वैभव देशमुख, नंदकिशोर घोडके, अजय दगडे, राजकुमार मुनोत, आदिनाथ दहिफळे, सतीश कांबळे, प्रदीप तांदळे आणि अनिल आठरे यांचा केक कापून सन्मान करण्यात आला.
संकेत पादिर यांनी सूत्रसंचालन केले, उदित हिरे यांनी सुयश परिख यांचा परिचय करून दिला, तर वैशाखी हिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
%20(1).jpeg)


0 Comments