राज्यपालांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे दिले आदेश

राज्यपालांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे दिले आदेश

एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार 

वेब टीम मुंबई : शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार असून हे सर्व बंडखोर गुवाहाटीमध्ये ठाण मांडून आहेत. दुसरीकडे शिवसेनेशी दगाबाजी केली म्हणत राज्यातील शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना करोनामुक्त झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले असून सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी असे आदेश दिले आहेत.

करोनामुक्त झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. करोनावर यशस्वी उपचार घेतल्यानंतर राजभवनात परतताच त्यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र त्यांनी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे. या पत्रानंतर आता महाराष्ट्र पोलिसांना बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी लागणार आहे. तसेच कोश्यारी पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे तसेच इतर आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. काही ठिकाणी तर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात आली आहेत. शंभुराज देसाई, बालाजी कल्याणकर, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव अशा बंडखोर आमदारांच्या घरासमोर खबरदारी म्हणून पोलीस तसेच सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे आमदार पुन्हा निडवून येणार नाहीत. या आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावं, असे वक्तव्य केले आहे. तसेच आमदारांना सुरक्षा पुरवण्यापेक्षा काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवा, असा सल्ला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments