मौलाना आझाद यांच्या काळात 1942 चे अंग्रेजो भारत छोडो ही चळवळ उभी राहिली
प्रा.डॉ. मेहबूब सय्यद : मौलाना आझाद व्याख्यानमालेच्या तीसरे शेवटचे पुष्प संपन्न
नगर: भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे.
त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते 1958 साली 30 कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या. 1923 साली अवघ्या 35 व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले.
धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. पुढे 1940-45 या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात 1942 चे अंग्रेजो भारत छोडो ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण साडे सात वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे. असे प्रतिपादन न्यू आर्टस् काॅमर्स अॅण्ड सायन्स् काॅलेजचे प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहा’त माणिक चौक येथील चांद सुलताना हायस्कूलमध्ये तीसरे शेवटच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments