पाकिटे घेवून कर्डिलेंवर टिका करण्याचा उद्योग थांबवावा
सागर भगत : अभिषेक भगत हा पुजारी नसून तनपुरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता
नगर : नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथील देवी मंदिराचा पुजारी असल्याचे तसेच सर्वसामान्य नागरिक असल्याचे सांगून अभिषेक भगत हे सर्वसामान्य नसून आ.प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणुकीनिमित्त वांबोरी येथे झालेल्या तनपुरेंच्या प्रचार सभेत अभिषेक भगत यांनी भाषण करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावर टिका करीत खोटेनाटे आरोप केले.
वास्तविक मंदिराचे पुजारी म्हणवणाऱ्या अभिषेक भगत यांनी स्वत:च्या भावकीला फसवून मंदिरावर ताबा मिळवला आहे. कोर्टाने मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट बनविण्याचे आदेश दिल्यापासून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. आपल्या हातून मंदिर जाईल या भीतीने ते कर्डिले यांच्या कारण नसताना टिका करीत तनपुरेंकडून पैसे घेवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असा आरोप बुऱ्हाणनगर येथील सागर भगत व दीपक भगत यांनी केला आहे.
भगत यांनी म्हटले आहे की, वांबोरी येथील सभेत अभिषेक भगत याने शिवाजीराव कर्डिले यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. स्वत: सर्वसामान्य नागरिक असल्याचे म्हटले. वास्तविक त्यांच्या सख्ख्या भावाने व चुलत्याने बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवलेली आहे. अभिषेक भगत स्वत: आ.प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या घराजवळ शुभेच्छा फलक लावतात. केक कापून त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकतात. मग ते सर्वसामान्य कसे असू शकतात. ते पुजारी असतील तर त्यांनी समाजात अशा प्रकारे गैरसमज निर्माण करण्याचे काम करू नये.
स्वत:ला गरीब सर्वसामान्य म्हणवणाऱ्या अभिषेक भगत यांची कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. आ.तनपुरे त्यांच्या इतक्या जवळचे आहेत तर मागील पाच वर्षांत त्यांनी मंदिर परिसराच्या विकासासाठी एक रुपयाचा निधी आणला नाही. भाविकांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची टाकीही त्यांना उभारता आली नाही. ते फक्त तनपुरेंकडून आर्थिक लाभ मिळवून कर्डिले यांच्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग करीत आहेत. त्यांचे व आमचे भावकीचे वाद आहेत. त्या वादाला राजकीय वळण देण्याचा उद्योग ते करीत आहेत.
कोर्टाच्या आदेशाने अभिषेक भगत यांची मंदिरावरील एकहाती कारभार आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आपले सगळच उत्पन्न बुडणार, आपले नाव राहणार नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना काही तक्रारच करायची असेल तर गावात समोरासमोर करावी, गावातच सर्वांसमोर आपले म्हणणे मांडावे. कोणाकडून तरी पैसे घेवून कर्डिले यांची बदनामी करू नये, असे सागर भगत व दीपक भगत यांनी म्हटले आहे.
0 Comments