घरी बसून चालणारे सरकार नको तर जनतेत मिसळणारे महायुती सरकार सत्तेवर आणा

 घरी बसून चालणारे सरकार नको तर जनतेत मिसळणारे महायुती सरकार सत्तेवर आणा

 रावसाहेब दानवे पाटील - वांबोरी येथे शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ भव्य सभा, विक्रमी गर्दीने भाजपच्या विजयाची नांदी

नगर: राज्यात २०१९ ला जनतेने भाजप शिवसेना युतीला सत्ता दिली असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी, जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजपचे नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत होते. सन २०१४ ला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर सुरू झालेल्या विकास प्रक्रियेला राज्यात  महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात खीळ बसली. आता मात्र भाजप महायुतीला बहुमताने विजयी करून शिवाजीराव कर्डिले यांच्या सारखा जनतेसाठी अहोरात्र काम करणारा आमदार राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर पाठवा असे आवाहन भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष सुरेश बनकर,  राजू शेटे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, धनराज गाडे, उदयसिंह पाटील आदींसह वांबोरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा खरा लाभ मोदी सरकार आल्यावर मिळू लागला. शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची मदत दिली जाते. महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवून राज्यातील महायुती सरकारने महिला भगिनींना सन्मान केला आहे. भाजप जनहिताचे निर्णय घेत असताना महाविकास आघाडीकडून चांगल्या योजनांना खीळ बसवण्याचे काम होत आहे. आज दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे. राज्यातही त्याच विचारांचे सरकार नक्की येईल असा दावा दानवे यांनी केला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारची तुलना केली तर महायुती सरकारच्या काळातील चांगले काम सहज दिसून येईल. आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली तर महाविकास आघाडी योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली. त्यामुळे आता ते मत मागायला तुमच्या दारात आले तर बहिणींनी त्यांना उभे सुद्धा करू नये. त्यांच्या सरकारच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्री होते. एकालाही राहुरी तालुका किंवा जिल्ह्यात‌ एखादी मोठी योजना आणता आली नाही. त्यामुळे यावेळी महायुतीच्या हातात स्पष्ट बहुमताची सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.


माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, मी उमेदवारी अर्ज भरल्यापासून सर्वसामान्य जनतेमध्ये असलेला उत्साह  गर्दीतून दिसून येत आहे. वांबोरी येथे तर विक्रमी संख्येने मतदार आले आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित असून राहुरी तालुक्यातील मतमोजणीतच मी विजयी होईल. खरं तर मागील वेळी ज्यांना संधी मिळाली ते आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाहीत. माझ्या काळात मंजूर झालेल्या योजनांमध्ये आडकाठी आणली गेली. त्यामुळे राहुरी शहर व तालुक्यात विकासकामे झाली नाहीत. त्यांच्या आजोबांचे नाव असलेला सहकारी साखर कारखाना बंद पडला. त्यांनी वडिलांच्या नावाचा खाजगी साखर कारखाना वांबोरी परिसरात काढला. तिथेही ऊस उत्पादकांना योग्य भाव दिला नाही ‌ शेजारच्या प्रवरा कारखान्याने ३२०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची खरी काळजी कोण घेतो हे दाखवून दिले.


सुभाष पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले यांची निवडणुक यावेळी जनतेनेच हातात घेतली आहे. मागील तीन निवडणुकीपेक्षा प्रचंड मताधिक्य त्यांना राहुरी तालुक्यातून मिळेल. यात वांबोरी परिसरातील मताधिक्य एक नंबरचे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments